सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची भूमिका
तळेरे : प्रतिनिधी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत तळेरे येथे असलेल्या सर्व्हिस रोडच्या गटाराचे नियोजन व बांधणी महामार्ग प्राधिकरणाने योग्य रितीने नसल्याने सलग दुसऱ्या वर्षी यावेळी देखील पहिल्याच पावसाळ्यात ब्रीजच्या खालील भागामध्ये सर्व्हिस रस्ता पाण्याखाली गेल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी वारंवार दाद मागूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून ठोस उपाययोजना करत नसल्याने त्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याची भूमिका राजेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
तळेरे येथील ब्रीजच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्तावरुन गावठणवाडी व घाडीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानजिक महामार्गाच्या खालून पाणी पलीकडे जाण्यासाठी चुकीच्या पध्दतीने मोरीचे बांधकाम केल्याने संपूर्णपणे वामनराव महाडिक हायस्कूल पासूनचे वाहत येणारे पावसाचे पाणी याच एकाच ठिकाणी येऊन साठते.त्यामुळे तेथील आजूबाजूचा परिसर तसेच पलीकडील बाजूस डोंगरे दुकान ते स्टेट बँक तळेरे शाखे समोरील परिसर जलमय होऊन जातो.सर्व्हीस रस्ता देखील पाण्यासाली जात असल्याने शालेय विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय होत आहे.या मार्गावरुन वामनराव महाडिक हायस्कूल,प्राथमिक शाळा तळेरे नं.१ तसेच मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयाचे आणि स्वीट लॅन्ड इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची नियमित वर्दळ सुरू असते.सर्व्हिस रस्त्या नजीकच्या विद्युत जनित्राखाली मोठ्या प्रमाणावर पाणी भरते व जर हे साचलेले पाणी विद्युत भारित झाल्यास त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधित सर्व यंत्रणांना याबाबत मागील वर्षांपासून पूर्वकल्पना देऊन देखील आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.याबाबत जर कोणत्याही प्रकारची अघटित दुर्घटना घडली तर सर्वस्वी जबाबदार संबंधित यंत्रणा असेल असा इशारा राजेश जाधव यांनी दिला आहे.









