पणजी : राज्यातील पायाभूत विकास साधण्यासाठी आणि विविध महत्त्वाचे प्रकल्प साकार करण्यासाठी सरकारतर्फे वित्त आयोगासमोर अनेक मागण्या व प्रस्ताव सादर केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. काल मंगळवारी विविध खाते प्रमुख आणि सचिवांची बैठक घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात राज्याच्या एकंदरित आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. सोळाव्या वित्त आयोगाचे पथक गोव्याला भेट देणार असून त्यावेळी आयोगाकडे काय मागण्या करायच्या, कोणते प्रस्ताव द्यायचे यावर चर्चा करण्यासाठी डॉ. सावंत यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी विविध मागण्या-प्रस्तावांवर विचार विनिमय करण्यात आला.
आयोगाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यासाठी चांगले नियोजन करण्याचे आणि योग्य त्या साधन-सुविधांचा वापर करावा यावर बैठकीत चर्चा झाली. महत्त्वाच्या प्रमुख खात्यांची आर्थिक स्थिती त्यांचा खर्च यावरही विचार करण्यात आला. पायाभूत सुविधा प्रकल्प यावर आतापर्यंत किती निधी खर्च झाला आणि आगामी काळात विविध प्रकल्पांवर किती खर्च होणार आहे याचा आढावा बैठकीतून घेण्यात आला. गोवा राज्याचा चौफेर विकास आणि आर्थिक गरज याचा ताळमेळ घालून वित्त आयोगाकडे योग्य ती मागणी करण्याचे ठरवण्यात आले. निधी शिवाय अन्य आर्थिक मदतीची मागणीदेखील आयोगाद्वारे करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. विविध खात्यांचे सचिव प्रमुख व इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.









