ऊसाचे उत्पादन कमी झाल्याचा उत्पादनावर परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या वर्षी ऊसाचे उत्पादन कमी झाल्याने साखरेच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीवर अंशतः बंदी घालण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे, अशी माहिती अन्न विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे. यंदा 3 कोटी 86 लाख टन ते 3 कोटी 90 लाख टन इतके साखर उत्पादन होईल असे अनुमान होते. पण प्रत्यक्षात उत्पादन 4 ते 5 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सावधगिरीची उपाययोजना करण्यात येणार आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱया साखरेच्या प्रमाणातही घट केली जाण्याची शक्यता आहे. यंदा रब्बी हंगामात पाऊस पडल्याने गव्हाच्या उत्पादनात घट झाली. तिचा अन्नसुरक्षेवर कोणता परिणाम होईल याचा आढावा घेण्यासाठी ग्राहक कल्याण विभाग आणि कृषी विभाग यांच्या अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत देशभरातून आलेल्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. मात्र गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झालेली नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या आघाडीवर समाधानाची भावना आहे. परिणामी, चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यंदा 11 कोटी 10 लाख टनांहून अधिक गहू उत्पादन झालेले आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरणासाठी गहू पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असे दिसून आल्याने बैठकीत कोणताही तत्काळ निर्णय घेण्यात आला नाही.
गव्हाच्या तजेलदारपणात घट
रब्बी हंगामात पिके काढणीला येत असताना पडलेल्या पावसामुळे उत्पादनात फारसा फरक पडलेला नाही. मात्र, पावसामुळे गव्हाच्या तजेलदारपणात घट झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी गव्हाची गुणवत्ता आणि तजेलदारपणा यांच्या संदर्भातील कठोर अटी शिथील कराव्यात अशी मागणी केंद्राकडे केली आहे. या मागणीसंबंधात केंद्र विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कुपोषण नियंत्रणात आणणार
बालके, स्तनपान देणाऱया माता, गर्भवती महिला आदींमधील रक्तघट कमी व्हावी आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून करडीचा तांदूळ (पॉलिश न केलेले किंवा फॉर्टिफाईड तांदूळ) दिला जाणार आहेत. या तांदळाचा भात चवीला तर चांगला असतोच पण त्यात पूर्ण पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अधिक प्रमाणात पोषक द्रव्ये असतात. यामुळे कुपोषणाची आणि रक्तघटीची (ऍनिमिया) समस्या दूर होऊ शकते, अशीही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.









