तामिळनाडूतील सत्तारुढ पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील सत्तारुढ द्रमकने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना कायदेशीर नोटीस पाठवून 500 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल अण्णामलाई यांनी सोमवारी अब्रुनुकसानीचा दावा करत द्रमुककडूनच 500 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.
तसेच अण्णामलाई यांनी नोटीस बजावून आधारहीन आरोपांसाठी माफी मागावी अशी मागणी द्रमुककडे केली आहे. द्रमुक शासनकाळात मेट्रो रेल्वे प्रकल्पात भ्रष्टाचार झाला असून त्याचे पुरावे आम्ही सीबीआयला सोपविणार असल्याचे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. सीबीआयकडून द्रमुक अध्यक्ष आणि भ्रष्टाचारात सामील अन्य लोकांना चौकशीसाठी पाचारण केले जात नाही तोवर संयम राखा असे अण्णामलाई यांनी द्रमुकचे संघटन सचिव आर.एस. भारती यांना सुनावले आहे. त्यांनीच अण्णामलाई यांच्या विरोधात नोटीस जारी केली होती.
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि पक्षाच्या अन्य नेत्यांविरोधात अण्णामलाई यांनी ‘डीएमके फाईल्स’ नावाचे दस्तऐवज जारी करून केलेले आरोप खोटे, आधारहीन अन् मानहानी करणारे असल्याचा दावा द्रमुक नेते भारती यांनी केला होता. द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांनी स्वतःच्या 56 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नसल्याचे म्हणत द्रमुक नेते भारती यांना अण्णामलाई यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती.









