मुंबई :
राज्यातील पूर परिस्थिती पाहता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरघोस मदतीचे आश्वासन दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले आहे. यामध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून राज्यातील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत देण्याची मागणी आम्ही केली आहे. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.हा अहवाल पाठवल्यानंतर यात बदल करता येत नाही. त्यामुळे पूर्ण नुकसानीचा अंदाज आल्यानंतरच तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.
नरेंद्र मोदी 8 ते 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, पूर परिस्थिती संदर्भात सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वास्तविक जागतिक स्तरावरील फिनटेक फेस्टिवल महाराष्ट्रमध्ये होत आहे. त्या फेस्टिवलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री दोघेही येत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट येत आहे. त्यामुळे फिनटेकची राजधानी महाराष्ट्रात तयार होत आहे. त्यामुळे हे फेस्टिवल महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील एकूण पूर परिस्थितीची कल्पना दिली
पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील एकूण पूर परिस्थितीची कल्पना दिली. कशा पद्धतीचे नुकसान झाले, याबाबत सांगितले. त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढी मदत आम्हाला करावी. त्यांनीही या गोष्टीला सकारात्मकता दाखवली आहे. लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. तुमचा प्रस्ताव आला की, कार्यवाही करू. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढी जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कर्जमाफी वारंवार करता येत नाही
कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितले आहे की, आम्ही आमच्या घोषणापत्रात आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही करणार आहोत. ती कधी करायची आणि कशी करायची यासंदर्भात एक समिती तयार झालेली आहे. ती समिती अभ्यास करत आहे. कारण कर्जमाफी वारंवार करता येत नाही. त्यामुळे ती करत असताना ती अधिक प्रभावी कशी करता येईल, याचा प्रयत्न आहे. आता आपल्याला कल्पना आहे की, आता खरीपासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आता शेतकऱ्यांना तातडीने त्यांच्या खात्यात मदत जाणे महत्त्वाचे आहे. खात्यातील मदत करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचेच नाव
मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे दी. बा. पाटील यांचेच नाव या विमानतळाला दिले जाईल, असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान राजकीय घडामोडींविषयी फारशी चर्चा झाली नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.









