6 वर्षांमध्ये प्रथमच जी-7 बैठकीला अनुपस्थिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यावेळची जी-7 बैठक कॅनडात होत आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अद्यातही तणावपूर्ण असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही बैठक कॅनडाची राजधानी ओटावा येथे आयोजित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर बैठकीला अनुपस्थित राहिले, तर तसे होण्याची ही गेल्या सहा वर्षांमधील प्रथम वेळ असेल. जी-7 या संघटनेत जगातील बलाढ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समावेश आहे. भारताने नुकतेच अर्थव्यवस्थेच्या आकारात जपानला मागे टाकून जगात चौथा क्रमांक पटकाविला आहे. सध्या अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीनच देश भारतापेक्षा पुढे आहेत.
संबंधांमध्ये किंचित सुधारणा
कॅनडा हा देश शीख दहशतवाद्यांना पाठीशी घालतो, असा आरोप भारताने केला आहे. कॅनडातील एक शीख दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारताने घडवून आणली असून भारतीय प्रशासन यासाठी थेट उत्तरदायी आहे, असा आरोप कॅनडाचे तत्कालीन नेते जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. मात्र, या आरोपासंबंधी कोणताही पुरावा आपल्याकडे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी कॅनडात सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात सत्ताधारी लिबरल पक्षाचा विजय झाला असला तरी नेतेपदी ट्रूडो यांच्याजागी मार्क कर्नी यांची निवड झाली होती. कर्नी यांनी भारताशी संबंध सुरळीत करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. तथापि, संबंध पूर्ववत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी बैठक
जी-7 परिषदेची बैठक कॅनडाची राजधानी ओटावा येथे पुढच्या वर्षीच्या मे मध्ये होणार आहे. अद्याप या बैठकीचे निमंत्रण भारताला पाठविण्यात आलेले नाही. मात्र, निमंत्रण आले, तरी ते स्वीकारले जाण्याची शक्यता जवळपास नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निमंत्रण टाळण्याचाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे, असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. कॅनडातील काही शीख दहशतवादी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिलेली असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आला आहे.
चर्चा प्रकियेला प्रारंभ
कॅनडामध्ये कर्नी यांच्या हाती सूत्रे आल्यानंतर त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद कर्नी यांनी भारतीय वंशाच्या हिंदू महिला अनिता आनंद यांना दिले आहे. अनिता आनंद यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांना तणाव कमी करुन संबंध सुधारण्याची इच्छा आहे. तथापि, मधल्या काळात त्यांच्यात इतका टोकाचा तणाव होता, की आता ते एकदम सुधारण्याची शक्यता नाही. काही काळात ते पूर्ववत होण्याची शक्यता आहे.









