कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असल्यामुळे अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या दोन दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर आणि त्यानंतर चीनने लावलेल्या प्रत्युत्तरात्मक टॅरिफमुळे कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 13 टक्क्यांनी घसरल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. तथापि, ट्रम्प प्रशासनाने नवे कर शुल्क लागू केल्यामुळे पुढील काही दिवस सावधगिरी बाळगावी लागेल, असे अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन वर्षांनंतर कच्च्या तेलाच्या किमतीतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. या घसरणीनंतर, किमती तीन वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती 65 डॉलरच्या खाली आल्या आहेत. तसेच अमेरिकन तेलाच्या किमती प्रतिबॅरल 62 डॉलरच्या खाली आल्या आहेत. गेल्या एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक घट झाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत यापूर्वी मार्च 2024 मध्ये गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 2 रुपये प्रतिलिटरने कपात करण्यात आली होती.
भारताचा रुपयाही मजबूत
एकीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना दुसरीकडे चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी मजबूत होत 85.25 वर बंद झाला. अमेरिकेतील नव्या कर संहितेमुळे सध्या जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना रुपयाची वाटचाल समाधानकारक असल्याने भारताला दिलासा मिळाला आहे.









