कोल्हापूर / सुधाकर काशीद :
पन्हाळ्याला शौर्याचा मोठा इतिहास. सिद्धी जोहारच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले. म्हणजेच या थोर राजाचा मुक्काम सलग तीन महिने या एका ठिकाणीच. महाराजांच्या इतक्या दीर्घ वास्तव्याचे भाग्य फक्त पन्हाळगडालाच. मराठी लष्करी भूप्रदेश म्हणून तर पन्हाळगडाचा इतिहास जागतिक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत जाईल, अशी स्थिती आहे. पण पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जाणार म्हणजे नेमके काय होणार, हे पन्हाळकरांना प्रशासनाने अतिशय व्यवस्थितपणे समजावून देण्याची गरज आहे. कारण वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा गेला तर पहिल्यांदा पन्हाळगडावरची वस्ती उठणार, असा समज गैरसमज झाला आहे आणि त्यातून विरोधास सुरुवात झाली आहे.
जागतिक वारसा स्थळ समिती सदस्यांनी पन्हाळ्dयाला भेट दिली आहे. पन्हाळा हा एक केवळ गड म्हणून नव्हे तर मराठा लष्करी भूप्रदेश या थीमवर पन्हाळगडाच्या इतिहासाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पन्हाळ्dयासह महाराष्ट्रातील इतर 12 गड–किल्ल्यांचा या लष्करी भूप्रदेशात समावेश आहे. शिवकाळात गड–किल्ल्यांवर किंवा त्याच्या आधाराने जो शौर्याचा इतिहास घडला, त्याची नोंद वारसा स्थळ समितीने घेतली आहे. अगदी जवळून एखादी वास्तू सतत पहायला मिळाली तर त्याचे वेगळेपण किंवा महत्व फारसे जाणवत नाही, असे म्हणतात आणि पन्हाळ्dयाच्या वाट्याला नेमकी ही स्थिती आली आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातील महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार पन्हाळगड आहे. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची गरज आहे. अलीकडे बाहेरच्या काही लोकांनी पन्हाळा फक्त ‘पिकनिक’साठी अशी ओळख आधी गडद करून ठेवली आहे. त्यामुळे पन्हाळा या ऐतिहासिक ठिकाणी आपण निघालोय म्हणजे इतिहासाला वंदन करायला निघालोय, अशी भावना नव्या पिढीला करून देण्याची गरज आहे.
पन्हाळगड जागतिक वारसा स्थळाच्या संकल्पित यादीत का येऊ शकणार आहे? तर मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून जे गड–किल्ले आहेत, त्यांचा वारसा स्थळाच्या यादीत समावेश होणार आहे. त्यात 12 गड–किल्ले व त्यातला एक पन्हाळगड आहे. रायगड या राजधानीच्या गडाचा ही त्यात समावेश नाही. पन्हाळ्dयाचा लष्करी भूप्रदेश म्हणून ‘रायगड’पेक्षा अधिक ठळक नोंद आहे, पण प्रशासन, पुरातत्व विभाग यांचा नेमक्या पातळीवर पन्हाळवासियांशी या मुद्यावर संवाद झाला पाहिजे.
जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा गेला की पहिल्यांदा पन्हाळ्dयावरची वस्ती हटवली जाणार, हा समज अगदी सहजपणे लोकांच्या डोक्यात घट्ट झाला आहे. आणि आपल्या अस्तित्वाचेच काय, हा प्रश्न पन्हाळवासियांच्या काळजात नक्कीच धसका निर्माण करून गेला आहे. मध्यंतरी कोणीतरी असे उठवले, की पन्हाळ्dयावरची शासकीय कार्यालये पहिल्यांदा हलवली जाणार आहे व ती वाघ बिळात एका–एका ठिकाणी नेली जाणार आहेत. पण तसे काहीही नाही, हे वास्तव आहे. उलट प्रांताधिकारी कार्यालयासाठी नव्या जागेत पन्हाळ्dयावरच जागा शोधली गेली आहे. पाण्याची टाकी हलवली जाणार आहे, पण तिची जागा व रचना वेगळी असणार आहे. पन्हाळ्dयावरची अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. मूळ पन्हाळा तेथील लोकवस्तीसह आहे, तेथेच राहणार आहे. मात्र हे सारे प्रशासनाने पन्हाळवासियांना व्यवस्थित समजून सांगण्याची गरज आहे. कारण प्रशासन आणि पन्हाळावासीय यांच्या संवादातील अंतर आणखी स्पष्ट आणि पारदर्शी राहण्याचीच गरज आहे. हा संवाद वरवरचा राहिला तर अडथळे येत राहणार, हे स्पष्ट आहे.
पन्हाळ्dयावर 1829 पासून लोकवस्ती आहे, असा पुरावा आहे. त्यामुळे पन्हाळा पन्हाळा तिथल्या लोकवस्तीसह जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असणार आहे. पण हे कोणा त्रयस्थाने सांगण्यापेक्षा प्रशासनाने पन्हाळ्dयावरील सर्व घटकांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे. वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा गेला तर पन्हाळ्dयाला त्याचा लाभ काय, हे देखील सांगण्याची गरज आहे आणि पण या क्षणी नक्कीच पन्हाळा वारसा स्थळांच्या यादीत जाणार, या मुद्यावरून पन्हाळकर कमी अधिक अस्वस्थ आहेत. कारण त्यांना नेमके काय होणार, हे व्यवस्थित सांगण्याची गरज आहे आणि केवळ असा संवाद झाला तरच पन्हाळ्dयावर पन्हाळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत होणार आहे.








