कुरुंदवाड प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी अलमट्टीची सध्याची 519:66 मीटरची उंची वाढवून ती 524 मीटर करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढीला आम्ही नेटाने विरोध करणार असल्याची माहिती अंकुश आंदोलनचे प्रमुख धनाजी चौगुले यांनी आज दिली
ते म्हणाले 2005 पासून ते 2021 पर्यंत सांगली- कोल्हापूरमध्ये 4 महापूर आले. त्याला अलमट्टी धरण जबाबदार आहे. अशी या भागातल्या जनतेची ठाम धारणा आहे. कारण अलमट्टी धरणात 519:66 मीटर उंचीने पाणी अडवले, त्याच वेळी म्हणजे 2005 मध्ये महापूर आला होता. आणि ज्या ज्या वेळी पाण्याचे नियोजन चुकले त्या त्या वेळी महापूर आलेला आहे.
पाऊस काळात अलमट्टीने 519:66 मीटर उंचीने पाणी साठवले व कोयना धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली. तर महाराष्ट्र सरकारला पाणी पातळी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनवण्या कराव्या लागतात. मग कर्नाटक सरकार एक दोन मीटरने पाणी पातळी कमी केल्यानंतर म्हणजे अलमट्टीतुन प्रति सेकंद 1 लाख ते 4 लाख क्युसेकने पाणी सोडून व पाणी पातळी 517 मीटरने खाली आणून पूर नियंत्रित केला जातो.
जर अलमट्टीची उंची 524 मीटर ने वाढवली व महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 5 लाखाने विसर्ग केला तरी पाणी पातळी ते 520 मीटरच्या आणू शकणार नाहीत.अशा वेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना येईल. म्हणून अलमट्टीची उंची वाढवण्यास सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज असून मोठा उठाव करून सरकारी पातळीवर कर्नाटक सरकार चा मनसुबा उधळून लावला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आंदोलन अंकुशने पूरग्रस्त जनतेच्या साथीने मागच्या वर्षांपासून यामध्ये काम करायला सुरुवात केली आहेच.पण लोकप्रतिनिधी सह सर्वांनी यामध्ये भाग घेऊन याला व्यापक स्वरूप देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.