इस्रायलच्या पंतप्रधानांचा पाठिंबा : हमासच्या खात्म्यासमवेत 3 लक्ष्य असल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान ट्रम्प यांनी गाझामधील विध्वंसामुळे पॅलेस्टिनींना तेथून अन्यत्र जाण्याशिवाय कुठलाच पर्याय राहिला नसल्याचे वक्तव्य केले. जॉर्डन आणि इजिप्तने या पॅलेस्टिनींना स्वत:च्या भूमीत आश्रय द्यावा, यानंतर अमेरिका गाझाला स्वत:च्या ताब्यात घेत पुनर्विकास करेल अशी सूचना ट्रम्प यांनी केली आहे.
गाझाला पुन्हा वसविण्याऐवजी पॅलेस्टिनींना अन्यत्र नव्या ठिकाणी वसविणे चांगले ठरेल, जर योग्य जागा मिळाली आणि तेथे चांगली घरे निर्माण करण्यात आली तर ते गाझामध्ये परतण्यापेक्षा चांगले ठरेल असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या या योजनेचे समर्थन करत यामुळे इतिहास बदलू शकतो अशी टिप्पणी केली आहे. गाझामध्ये आमची तीन उद्दिष्टं आहेत. पहिले उद्दिष्ट ओलिसांची मुक्तता, दुसरा गाझामध्ये स्वत:चा पूर्वीपासून निश्चित हेतू पूर्ण करणे आणि तिसरे हमासच्या सैन्य शक्तीला पूर्णपणे संपविणे आहे. आम्ही हे तिन्ही उद्दिष्ट प्राप्त करू असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
व्हाइट हाउसमधील सर्वात चांगले मित्र
ट्रम्प हे व्हाइट हाउसमधील इस्रायलचे आतापर्यंतचे सर्वात चांगले मित्र आहे. ट्रम्प यांनी मागील कार्यकाळात ज्याची सुरुवात केली होती, तेथूनच पुन्हा सुरू केले आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळेच ओलीस स्वत:च्या घरी परतू शकेल असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
मध्यपूर्वेत शांतता आणण्याची योजना
अमेरिका गाझाला स्वत:च्या नियंत्रणात घेऊ शकतो. अमेरिका तेथे असलेले धोकादायक बॉम्ब आणि अन्य शस्त्रास्त्रांना हटवू शकतो. तसेच नष्ट झालेल्या इमारतींचा ढिगही हटवू शकतो. गाझामध्ये सफाई करत तेथे आर्थिक विकास घडवून आणू शकतो, ज्यामुळे तेथील लोकांसाठी नोकऱ्या आणि घराची अमर्यादित व्यवस्था निर्माण होऊ शकेल. मागील अनेक महिन्यांपासून गाझाची स्थिती समजून घेतली असून तेथे कब्जा करत विकास करण्याच्या योजनेला जगाच्या आघाडीच्या नेत्यांकडून जबरदस्त समर्थन मिळाले आहे. मध्यपूर्वेत शांतता आणण्याची ही उपयुक्त योजना आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मी लवकरच इस्रायल, गाझा, सौदी अरेबिया आणि मध्यपूर्वेतीलअन्य स्थानांचा दौरा करणार आहे. मध्यपूर्व हे चांगले अन् सुंदर क्षेत्र असून तेथे चांगले लोक राहतात, तेथील खराब नेतृत्वाने अनेक समस्या निर्माण केल्या असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तणाव आणखी वाढणार : हमास
हमासने ट्रम्प यांच्या प्रस्तावाला त्वरित फेटाळले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचे हे वक्तव्य गाझामध्ये अराजकता आणि तणाव वाढविणारे असल्याचे हमासचे वरिष्ठ अधिकारी सामी अबू जुहरी यांनी म्हटले आहे. गाझामध्ये ट्रम्प यांच्या या योजनेला आम्ही लागू करू देणार नाही. आमच्या लोकांवर होत असलेले हल्ले रोखणे आवश्यक आहे, त्यांना त्यांच्या भूमीवरून बेदखल करण्याचा विचार कुणी करू नये असे हमासकडून म्हटले गेले आहे. इजिप्त आणि जॉर्डनने देखील ट्रम्प यांची ऑफर फेटाळली आहे. जागतिक नेत्यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या इच्छेचा मान राखावा असे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघातील पॅलेस्टाइनच्या प्रतिनिधीने काढले आहेत.
युद्ध संपुष्टात आणण्यावरून चर्चा
अमेरिका सातत्याने इस्रायल आणि हमास यांच्यावर शस्त्रसंधी जारी ठेवण्यावरून दबाव राखून आहे. याचमुळे ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली गेली. 19 जानेवारी रोजी इस्रायल आणि हमास यांच्यात 15 महिन्यांच्या युद्धानंतर शस्त्रसंधी सुरू झाली होती. यादरम्यान ओलीस अन् कैद्यांची अदलाबदली केली जात आहे.









