वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी टॉलिवूड कलाकार व चित्रपट निर्मात्यांना आमचे सरकार तेलगू चित्रपटसृष्टीच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देत राज्यात कायदा-सुव्यस्थेच्या मुद्द्यांवर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. रेवंत रे•ाr यांनी गुरुवारी बंजारा हिल्स येथील तेलंगणा राज्य पोलीस कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये टॉलिवूडच्या प्रमुख कलाकार व चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाल्यावर राज्य सरकार आणि चित्रपटसृष्टीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी टॉलिवूड कलाकारांना स्वत:च्या चाहत्यांना नियंत्रित करण्याचा आणि चित्रपटसृष्टीने स्वत:च्या जबाबदाऱ्या ओळखण्याची सूचना केली. कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्यात चित्रपटांच्या स्पेशल स्क्रीनिंगवर त्यांनी बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बैठकीत दिग्गजांची हजेरी
या बैठकीत तेलंगणा चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष दिल राजू यांच्या नेतृत्वात टॉलिवूडचे दिग्गज सामील झाले. यात नागार्जुन, वरुण तेज, साई धर्म तेज, कल्याण राम, शिव बालाजी, अदिवी शेष, नितिन आणि वेंकटेश यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. तर दिग्दर्शक कोरटाला शिवा, अनिल रविपुडी, के. राघवेंद्र राव, प्रशांत वर्मा, साई राजेश आणि निर्माते सुरेश बाबू, के.एल. नारायण, दमोधर, अल्लू अरविंद, बीवीएसएन प्रसाद आणि चिन बाबू यांनी या बैठकीत भाग घेतला आहे.
‘पुष्पा : द रुल’ प्रीमियरवेळी दुर्घटना
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा : द रुल’च्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा 9 वर्षीय मुलगा जखमी झाला होता. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. तर उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. तर जखमी मुलाची प्रकृती 20 दिवसांनी सुधारली असल्याचे समजते.
स्पेशल स्क्रीनिंगवर बंदी
बेनिफिट शोजची अनुमती मिळणार नाही. जमावाला नियंत्रित करणे पोलिसांसोबत प्रसिद्ध व्यक्तींचीही जबाबदारी आहे. सरकारने सध्या चित्रपटांच्या स्पेशल स्क्रीनिंगवर बंदी घातली असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तसेच त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकांना इशारा दिला आहे. अभिनेत्यासाठी काम करणाऱ्या बाउन्सर्सनी चेंगराचेंगरी दरम्यान बेजबाबदार वर्तन केले होते. त्यांच्या आक्रमक वर्तनामुळेच दुर्घटनेला गंभीर स्वरुप प्राप्त झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
काँग्रेस सरकारकडून टॉलिवूड लक्ष्य
अल्लू अर्जुन विरोधात झालेली कारवाई देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आता भाजप नेते अमित मालवीय यांनी तेलंगणाच्या रेवंत रे•ाr सरकारवर तेलगू चित्रपटसृष्टी म्हणजेच टॉलिवूडला लक्ष्य करण्याचा आरोप केला आहे. तेलगू कलाकार आणि निर्मात्यांकडून एकप्रकारे खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेवंत रे•ाr सरकार राज्यात अत्यंत अलोकप्रिय ठरले असल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे.









