आमचे कुठलेच भले होणार नाही : द्रमुक नेते
वृत्तसंस्था/ चेन्नई
भाजपने तामिळनाडूशी संबंधित नेते सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. अशास्थितीत तामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष द्रमुककडुन राधाकृष्णन यांना समर्थन जाहीर केले जाऊ शकते असे मानले जात होते. परंतु द्रमुकने राधाकृष्णन यांना समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. द्रमुक विरोधी पक्षांच्या आघाडीच्या निर्णयासोबत राहणार आहे.
सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्याने तामिळनाडूचे कुठलेच भले होणार नसल्याचे वक्तव्य द्रमुकने केले आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिदासाठी स्वत:चा उमेदवार घोषित केल्याने तामिळनाडूचे भले होणार नाही. द्रमुकने राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याची गरज नाही. आमचा पक्ष इंडी आघाडीच्या निर्णयाचे पालन करेल असे उद्गार द्रमुकचे माजी राज्यसभा खासदार एलंगोवन यांनी काढले आहेत.
राधाकृष्णन यांचे नामांकन ही त्यांची पदोन्नती आहे, परंतु यामुळे तामिळनाडूचे कल्याण होणार नाही. राधाकृष्णन यांना ही उमेदवारी मार्च-एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. भाजप नेतृत्वाने तमिळांसाठी चांगले काम केल्याचा दावा करण्यासाठी एका तमिळ व्यक्तीची निवड केली आहे. याचबरोबर नव्या उपराष्ट्रपतिपदासाठी कार्यकाळ केवळ 2 वर्षांचा असेल, जो जगदीप धनखड यांच्या कार्यकाळाचा उर्वरित हिस्सा असेल असे एलंगोवन यांनी म्हटले आहे.
राधाकृष्णन हे तामिळनाडू भाजपचे प्रमुख चेहरे राहिले आहेत. राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते असून तामिळनाडूच्या कोइम्बतूर मतदारसंघाचे खासदार म्हणून दोनवेळा ते निवडून आले होते. सुमारे 4 दशकांपर्यंत ते तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय होते.









