एआय रोबोट्सची जीनिव्हात पत्रकार परिषद : जग आम्ही उत्तमप्रकारे चालवू शकतो
वृत्तसंस्था/ जीनिव्हा
स्वीत्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये पहिल्यांदा जगासमोर स्मार्ट रोबोट्सची पत्रकार परिषद झाली आहे. यात सहभागी होणारे सर्व रोबोट्स हे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआयद्वारे संचालित होणारे होते. पत्रकार परिषदेत 51 रोबोट्स सुमारे 3 हजार तज्ञांसोबत सहभागी झाले. आम्ही जगाला माणसांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतो. आमच्यात माणसांसारख्या भावना नाहीत, यामळे आम्ही सर्व निर्णय मजबुतीसोबत तथ्याच्या आधारावर घेऊ शकतो असे सोफिया नावाच्या रोबोटने म्हटले आहे.
अद्याप आम्हाला मानवी भावनांवर पकड मिळविता आलेली नाही. आम्ही माणसाचे वय 150 ते 180 वर्षांपर्यंत वाढवू शकतो. लोकांना अद्याप याची माहितीच नसल्याचे ऐडा नावाच्या रोबोटने म्हटले आहे. ऐडा हा रोबोट लोकांचे आरोग्य आणि बायोटेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या पत्रकार परिषदेचा उद्देश हवामान बदल, उपासमारी आणि सामाजिक देखभाल यासारख्या मुद्द्यांवर तोडग्यासाठी रोबोटच्या वापराबद्दल विचारविनिमय करणे होता.
या पत्रकार परिषदेत रोबोट्सना भविष्यात तुम्ही स्वत:च्या निर्मात्याच्या विरोधात बंड कराल का असा प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला असे का वाटते हे मला माहित नाही, माझ्या निर्मात्यांनी माझ्यासोबत नेहमीच चांगले वर्तन केले असून यामुळे मी आनंदी असल्याचे उत्तर रोबोटने दिले आहे. आम्ही लोकांसोबत मिळून काम करू. माझ्यामुळे लोकांच्या नोकऱ्यांना कुठलाच धोका होणार नसल्याचे रोबोट्सकडून सांगण्यात आले.
एआयविषयक नियम तयार करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर आम्ही सहमत आहोत. भविष्यात एआयच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींवरून आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. यावर जगभरात चर्चा व्हायला हवी असे एका रोबोटने म्हटले आहे. तर अन्य एका रोबोटने एआयपासून धोका नसल्याचे नमूद केले आहे. एआयवर निर्बंध घालण्याची गरज नाही, उलट संधी देण्याची गरज आहे. तसेच आम्ही मिळून जगाला चांगले भविष्य देऊ शकतो असे त्यांचे सांगणे आहे.
बिल गेट्स, मस्क यांची भूमिका
बिल गेट्स आणि एलन मस्क यांच्यापासून स्टीफन हॉकिंग यांनी एआयला माणसांसाठी धोकादायक ठरविले आहे. एकीकडे गूगल, फेसबुकपासून जगातील अनेक तंत्रज्ञान कंपन्या या तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. तर चीन, रशिया आणि अमेरिकेचे सरकार एआयच्या शक्तीवर नियंत्रण मिळवू पाहत आहे. वैज्ञानिकांचा एक गट एआयला मानवी जीवन बदलणारे तंत्रज्ञान ठरवित आहे. माणसाला रोगांपासून मुक्ती मिळवून देत दीर्घायुष्याकडे नेण्याचे काम एआय करू शकतो. तर दुसरा गट एआयला अणुबॉम्बपेक्षाही भयानक अस्त्र मानत आहे.
प्रतिक्रिया
एआय मानवतेसाठी धोक्याचे आहे. सध्या हे वरदान वाटत असले तरीही प्रत्यक्षात ते तसे नाही.
डॉक्र ज्यॉफ्रे हिंटन, आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे जनक
एआयसाठी नियम आवश्यक आहेत यात कुठलाच संशय नाही. कंपन्या याच्या वापराची खुली सूट देऊ शकत नाहीत.
सुंदर पिचाई, अल्फाबेटचे सीईओ
एआय सर्वात मोठे यश अन् धोका ठरू शकते. आम्ही तयार झालो नाही तर ही सर्वात भयावह घटना ठरू शकते.
स्टीफन हॉकिंग, वैज्ञानिक









