उच्चस्तरीय समितीला एसकेएमने दिला नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) शेतकऱ्यांसंबंधीच्या मागण्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन समितीशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन समितीने एसकेएमला 3 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवर नाकाबंदीच्या संदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. परंतु एसकेएम या आंदोलनाचा हिस्सा नाही. शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी यापूर्वीच समितीशी चर्चा करण्यास नकार दिला होता. न्यायालयाचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही, कारण शेतकरी केंद्र सरकारसोबत धोरणात्मक मुद्द्यांवर लढत असून यात न्यायालयाची कुठलीच भूमिका नसल्याचे एसकेएमने म्हटले आहे.
4 जानेवारीला महापंचायत
खनौरी सीमेवर शेतकरी संघटनांनी 4 जानेवारी रोजी महापंचायत बोलाविली आहे. शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी आवश्यक संदेश शेतकऱ्यांना देऊ इच्छितो, असे म्हटले आहे. ही महापंचायत सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे. यात पंजाब, हरियाणासोबत अन्य राज्यांमधील शेतकरी सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण
केंद्र सरकारवर पिकांसाठी एमएसपीच्या कायदेशीर हमीसमवेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा दबाव आणण्यासाठी डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून पंजाब आणि हरियाणादरम्यान खनौरी सीमेवर आमरण उपोषण करत आहेत. सुरक्षादलांकडून आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने रवाना होण्यापासून रोखण्यात आल्यावर संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनर अंतर्गत शेतकरी मागील वर्षाच्या 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणादरम्यान शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून आहेत.









