देशात नाही दूधाची कमतरता : पुरवठ्याच्या स्थितीवर नजर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने बटर आणि अन्य दुग्धोत्पादनांच्या आयातीवरून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. बटर सारख्या दुग्धोत्पादनांची आयात केली जाणार असल्याचे केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी सांगितले आहे.
डेअरी उत्पादनांचा पुरवठा वाढविण्यासाठी सरका आता देशांगर्तत क्षेत्राची मदत घेणार आहे. डेअरी उत्पादनांची कमतरता असल्याचा दावा खरा नाही. बटर सारख्या डेअरी उत्पादनांची आयात केली जाणार नाही. देशात दूधाची कमतरता नाही. तसेच सरकार दूधपुरवठ्यावर नजर ठेवून असल्याचे रुपाला यांनी सांगितले आहे.
डेअरी उत्पादनांची मागणी वाढली आहे. आमच्याकडे देशांतर्गत क्षेत्र अत्यंत मोठे असून याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्ही योग्य व्यवस्थापन करणार आहोत, यामुळे चिंतेची कुठलीच बाब नाही. दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांनी निश्चिंत रहावे असे रुपाला यांच्याकडून म्हटले गेले.
दुग्धोत्पादनांच्या दरांवरूनही चिंता केली जाऊ नये. सध्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याचे रुपाला यांनी नमूद केले आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी देशांतर्गत बाजारपेठेत बटरचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय केले जात असल्याचे वक्तव्य केले होते. गरज भासल्यास बटर आणि अन्य काही दुग्धोत्पादनांची आयात केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. परंतु त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. यानंतर सरकारला बटर इत्यादी दुग्धोत्पादनांच्या आयातीचा कुठलाच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते.
पवारांचा सरकारला इशारा
दुग्धोत्पादनांच्या आयातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारला इशारा दिला होता. दुग्धोत्पादनांची आयात करण्यात आल्यास देशांतर्गत डेअरी उद्योगाला फटका बसणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पवारांनी यासंबंधी पुरुषोत्तम रुपाला यांना एक पत्रही लिहिले होते. दुग्धोत्पादनांच्या आयातीसंबंधी केंद्र सरकारचा कुठलाही निर्णय पूर्णपणे अस्वीकारार्ह असेल असे पवारांनी या पत्रात नमूद केले होते.









