अन्न-नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या नव्या निकषांनुसार राज्यातील अनेक बीपीएल, एपीएल रेशनकार्डे रद्द होण्याची भीती नागरिकांना होती. मात्र, आता कोणतेही रेशनकार्ड रद्द करणार असल्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले आहे. त्यामुळे रेशनकार्ड रद्द होण्याची भीती असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
हासन येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात जे पात्र आहेत, त्यांनाच बीपीएल, एपीएल रेशनकार्ड वितरीत केले जाणार आहे. मात्र, कोणतेही कार्ड रद्द करणार नाही. बँक खात्यासंबंधी समस्या असल्याने काहींना रेशन वितरण स्थगित झाले होते. त्यात दुरुस्ती करण्याची सूचना अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना तीन महिन्यात नवी बीपीएल, एपीएल रेशनकार्डे वितरीत केली जातील, असे ते म्हणाले.
यापूर्वी भाजपचे सरकार असताना नव्या बीपीएल कार्डासाठी 3 लाख अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची योग्य पडताळणी करून मंजुरी देण्याची सूचना खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. ठराविक निकषांचा विचार करून पात्र असणाऱ्यांना रेशनकार्डांचे वितरण केले जणार आहे, असा पुनरुच्चार मुनियप्पा यांनी केला.









