पणजी : रेल्वे मंत्रालयाने ‘होस्पेट – हुबळी – तिनईघाट – वास्को – द – गामा रेल्वे दुपदरीकरण’ प्रकल्पासाठी मुरगाव तालुक्यात सुमारे 6000 चौरस मीटर जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी मंत्रालयाच्या विधानात पर्यटन आणि व्यापाराचाही उल्लेख आहे. तरीही विरोधक केवळ कोळशाचाच उल्लेख करून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम करीत आहेत. परंतु आपण कोळसा वाहतुकीचे प्रमाण वाढवू देणार नाही. पूर्वी ज्याप्रमाणे ठरले आहे, त्याचप्रमाणे कोळसा वाहतूक केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पावरून विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. रेल्वे मंत्रालयाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, संपादनासाठी ओळखली जाणारी जमीन मुरगाव तालुक्यातील केळशी, सांकवाळ या गावांमध्ये येते.
रहिवाशांना आणि भागधारकांना सक्षम प्राधिकरणाकडे – उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, मुरगाव यांच्याकडे आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सुनावणी घेतली जाईल. जमिनीचे आराखडे आणि तपशील मुरगाव येथील भूसंपादन अधिकारी कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध आहेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे गोव्याची कोळसा हाताळणी क्षमता वाढवणार नाही आणि ती तशीच राहील, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. होस्पेट – हुबळी – लोंढा – तिनईघाट – वास्को – द – गामा या मार्गामुळे कोळसा, लोहखनिज आणि पोलाद वाहतुकीला गती मिळेल आणि गोवा आणि हंपीमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोळसा वाहतुकीसंदर्भात बोलताना अतिरिक्त कोळसा वाहतूक केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.









