वृत्तसंस्था/ कोलंबो
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात उभय संघात दोन कसोटी आणि दोन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. लंकेचा फलंदाज पी. निसांकाला दुखापतीमुळे पहिली कसोटी हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उभय संघातील पहिली कसोटी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान गॅले येथे तर दुसरी कसोटी 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गॅलेत खेळवली जाणार आहे. या दोन संघातील पहिला वनडे सामना 12 फेब्रुवारीला तर दुसरा वनडे सामना 14 फेब्रुवारीला होणार आहे. लंकेच्या निसांकाला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळताना स्नायू दुखापत झाली होती. हि दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. कोलंबोमध्ये त्याच्यावर वैद्यकिय उपचार सध्या चालू आहेत. मात्र 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लंकेचे नेतृत्व धनंजय डिसिल्व्हाकडे सोपविण्यात आले असून स्टिव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे.









