दुखापतग्रस्त केन विल्यम्सनला खेळवण्यासाठी किवीज बोर्ड प्रयत्नशील : दोन महिन्यात विल्यम्सन तंदुरुस्त होण्याची आशा
वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा दिग्गज व अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन हा गंभीर दुखापतीनंतर वेगाने रिकव्हर होताना दिसत आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयोजित केला गेला आहे. अशात विल्यम्सनची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. असे असले तरी विश्वचषकात विल्यम्सन खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला विश्रांती देत पुढील सामन्यात तो संघाचा भाग असेल असे सूतोवाच मिळत आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये मध्ये केन विल्यम्सन गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. गुजरातचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाला. या पहिल्याच सामन्यात सीमारेषेजवळ झेल पकडताना विल्यम्सन दुखापतग्रस्त झाला. दुखापत गंभीर असल्यामुळे गेले तीन महिने मैदानावर बाहेर आहे. यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सरावाला सुरुवात केली असून, तो न्यूझीलंड संघात सामील देखील झाला आहे. तो अद्याप फिट नसला तरी, आता मी वनडे विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो पूर्ण फिट होण्याची शक्यता आहे. तसेच विश्वचषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसवण्याची तयारी देखील किवीज मंडळाने केली आहे. या सर्व परिस्थितीत त्याला विश्वचषक संघात सहभागी करून घेण्यास बोर्ड अनुकूल आहे.
इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी संघात सामील
विल्यम्सन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. मात्र, त्याची भूमिका ही फक्त संघाला पाठिंबा देण्याची असणार आहे. प्रत्यक्षात मैदानावर उतरून खेळणार याबाबत कुठलीही माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिलेली नाही. दरम्यान, न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यात चार टी-20 व चार वनडे सामन्यांची मालिका पुढील महिन्यात खेळवली जाणार आहे. या मालिकेतील कामगिरीनंतर विश्वचषक स्पर्धेसाठी किवीज संघाची घोषणा होईल.
दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये विल्यम्सनने मोलाचे योगदान दिले होते. या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने फायनलदेखील गाठली होती. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याचा संघात सहभाग असावा यासाठी किवीज बोर्ड प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला बोर्ड त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असून इंग्लंडविरुद्ध मालिकेत तो मार्गदर्शनाच्या भूमिकेत असणार आहे. अर्थात, वर्ल्डकपसाठी दोन महिन्याचा कालावधी असला तरी यादरम्यान विल्यम्सनच्या दुखापतीत सुधारणा होईल, असा विश्वास किवीज बोर्डाने व्यक्त केला आहे.









