पुणे / प्रतिनिधी :
एकवेळ आपल्याला नव्याने सर्व काही उभे करायची वेळ आली तरी चालेल. पण विचारधारेसोबत जायचे नाही, हा निर्णय पक्का असून, भाजपसोबत कदापि जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर दिल्लीत मांडली.
पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. पक्षामध्ये फूट पडो वा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न होवो. राष्ट्रवादी कधीही आपल्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. एकवेळ नव्याने सर्व काही उभे करायची वेळ आली तरी चालेल. मात्र, तडजोड शक्य नाही. आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केल्याचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह बळकाविण्याचा डाव
लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे जाण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यात येत आहे. यामागे मोदी-शहा यांचा डाव आहे. अलीकडे केंद्रीय आयोगाच्या निर्णयात केंद्रातील नेत्यांचा हस्तक्षेप होत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्हदेखील दुसऱ्या गटाला कसे मिळेल, यासाठी खटाटोप सुरू आहे. मात्र, आम्ही केंद्राच्या दबावाला बळी पडणार नाही. आम्हाला भाजपाविरोधात लढायचे आहे. ती भूमिका कायम असेल. मनात कुणीही कोणतीही शंका आणू नका. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले.
9 वर्षांत 9 सरकार पाडली : सुप्रिया सुळेही आक्रमक
दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. संसदेमध्ये अविश्वास ठरावावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी मणिपूरप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर नऊ वर्षांत सरकारने नऊ सरकार पाडल्याकडे लक्ष वेधत पक्ष फोडणे हा सरकारचा एक कलमी कार्यक्रम असल्याची टीका केली.