ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेत होतोय मस्क यांना विरोध : निशाण्यावर टेस्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन प्रशासनात एलॉन मस्क यांच्या हस्तक्षेपाच्या विरोधात जगभरात संताप वाढत आहे. शेकडो टेस्ला शोरुमबाहेर लोकांनी मोठ्या संख्येत निदर्शने केली आहेत. अमेरिकन प्रशासनाच्या संवेदनशील डाटापर्यंत एलॉन मस्क यांची पोहोच अत्यंत धोकादायक असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे आहे. ट्रम्प प्रशासनात मस्क यांच्या भूमिकेला विरोध होत आहे. याचदरम्यान मस्क हे मे महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या डीओजीईच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
अमेरिकेसह युरोपच्या अनेक देशांमध्ये लोकांनी टेस्ला शोरुमबाहेर रॅली काढली आहे. एलन मस्क हे अमेरिकेच्या प्रशासनात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लोक करत आहेत. ‘टेस्ला रोखा, मस्क यांना नुकसान पोहोचवा’, ‘मस्क यांना रोखून जीवन अन् लोकशाही वाचवा’ अशा घोषणा निदर्शक देत आहेत. टेस्लाची कार खरेदी करू नका, टेस्लाचे समभाग विकून टाका, टेस्ला टेकडाउन आंदोलनात भाग घेण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. अमेरिकेत 277 टेस्ला शोरुमबाहेर मोर्चा काढण्यात आला. तर जगभरात 200 अधिक ठिकाणी अशाप्रकारची निदर्शने झाली आहेत. ही निदर्शने ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंत फैलावली आहेत. जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, फिनलंड, नॉर्वे, डेन्मार्क, न्युझीलंड, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातही एलॉन मस्क आणि टेस्ला विरोधात निदर्शने झाली आहेत.
पूर्वी कॅलिफोर्नियाच्या सॅन जोसमध्ये टेस्लाचे मुख्यालय होते, आता टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये नवे मुख्यालय तयार करण्यात आले आहे. निदर्शकांनी या दोन्ही ठिकाणी स्वत:चा विरोध नोंदविला आहे. एलॉन मस्क हे सद्यकाळात अमेरिकेच्या प्रशासनात दक्षता विभागाचे प्रमुख आहेत, नोकऱ्यांमध्ये कपात आणि खर्चात कपातीची जबाबदारी त्यांनाच मिळाली आहे. परंतु संवेदनशील डाटापर्यंत मस्क यांच्या अॅक्सेसला लोक विरोध करत आहेत. निदर्शनांमध्ये टेस्ला कारचे मालक, प्रसिद्ध व्यक्ती आणि एका डेमोक्रेटिक खासदारासह मोठ्या संख्येत लोक सामील झाले. मस्क यांना शासकीय पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणे हा निदर्शनांचा उद्देश आहे.
न्यूयॉर्क शहरात मॅनहॅटन टेस्ला स्टोअरसमोर एकत्र येत लोकांनी मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. टेस्लाच्या विक्रीत होत असलेल्या घसरणीदरम्यान या निदर्शनांमुळे मस्क यांची चिंता वाढली आहे.









