संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीचे औचित्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला भेट देऊ शकतात. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (युएनजीए) वार्षिक बैठकीला उपस्थित राहू शकतात. मोदींचा दौरा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो. या दौऱ्याचा खरा उद्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणे आणि व्यापार आणि शुल्काशी संबंधित वाद सोडवणे हासुद्धा असू शकतो. या दौऱ्यात दोन्ही नेते व्यापार कराराची घोषणा देखील करू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत 26 सप्टेंबर रोजी मोदी भाषण करणार आहेत. या काळात मोदी ट्रम्प यांच्यासह इतर नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेऊ शकतात. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हेसुद्धा या दौऱ्यावेळी अमेरिकेत असल्याने ते सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान मोदींना भेटू शकतात. मोदी यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेला गेले होते. या दरम्यान, ते व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांना भेटले होते. ट्रम्प यांनी आयात शुल्क मुद्यावर मोदींचे कौतुक करतानाच त्यांना एक कठोर वाटाघाटी करणारा म्हणून वर्णन केले. त्यांनी पंतप्रधान मोदींना आपले मित्र असे संबोधताना ते चांगले काम करत असल्याचेही सांगितले होते.









