केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांचे संकेत
प्रतिनिधी/ बेंगळूर
संक्रातीनंतर दूध दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी पार पडलेल्या कर्नाटक दूध महामंडळाच्या (केएमएफ) बैठकीत नंदिनी दूध दरात प्रति लिटर 5 रुपयांने वाढ करण्याबाबत चर्चा झाली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यापूर्वीच राज्यात नंदिनी दूध दरात आणि त्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. आता पुन्हा दर वाढ करण्यास केएमएफ सरसावले आहे. दूध दरात वाढ करण्याचे संकेत केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांनी दिले आहेत. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दूध दरवाढीची मागणी झाली आहे. यासंबंधीतचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाईल. अंतिम निर्णय सरकारच घेईल, असे स्पष्ट केले.
दूध उत्पादक शेतकरी संकटात असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्दशनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नव्यावर्षात शेतकऱ्यांना किमान प्रति लिटर 5 रुपये दूध दरवाढ करून दिलासा देण्याची शक्यता आहे. विविध दूध पुरवठा निगमच्या अध्यक्षांची बैठक बोलावून सिद्धरामय्या शेतकरी हिताचा निर्णय घेणार असल्याचे भीमा नायक यांनी सांगितले आहे.
यापूर्वी दक्षिण भारतातील इतर राज्ये आणि अमुल ब्रॅन्ड दूधाची तुलना केल्यास कर्नाटकातील नंदिनी दूधाचा दर कमी आहे. दरवाढी नंतरही आमच्या राज्यात दूधाचा दर कमी आहे. कमी किंमतीत केएमएफ दर्जेदार दूधाचा पुरवठा करत आहे, असे भीमा नायक यांनी सांगितले होते.
नंदिनी तुपाला मोठी मागणी
नंदिनी तुपाला मोठी मागणी असून अयोध्येतील अंजनेयस्वामी मंदिरात मागील दहा वर्षापासून या ब्रॅन्डच्या तुपाचा वापर होत आहे. मी शिर्डीला भेट दिली असता, तेथूनही तुपाची मागणी झाली आहे. आगामी दिवसात शिर्डीला देखील नंदिनी तूप पुरवठा करण्यात येईल. तिरूपतीतील लाडू प्रसादातील भेसळ संदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर नंदिनी ब्र्रॅन्डच्या तुपाची विक्री 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. केएमएफने नंदिनी ब्रॅन्डच्या नावाने डोसा आणि इडली पीठाचे अनावरण केले आहे. गुरूवारपासून बेंगळूरमधील बाजारपेठेत हे विक्रीला उपलब्ध झाले आहे. दररोज 5 हजार मॅट्रीक टन डोसा, इडली पीठाची विक्री करण्याचे उद्दीष्ट बाळगले आहे असे त्यांनी सांगितले.









