शिरोळ/प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यात हातकणंगले (Hatkanangale) आणि शिरोळ (Shirol) तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शिरोळमध्ये अवघ्या सहा तासात 102 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले. शेतमजुरांना काम नाही सर्वसामान्य घटकाची यावर्षीची दिवाळी गोड नाही याचा राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने (mp dhairyasheel mane) यांनी केली.
शुक्रवारी रात्री शिरोळ तालुक्यात 102 मिलिमीटर पाऊस पडला. हातकणंगले तालुक्यात सरासरी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊन सर्व पिक पाण्याखाली आहेत. या पिकांच्या झालेल्या नुकसान परिस्थितीची पाहणी खासदार धैर्यशील माने यांनी केली. त्यानंतर खासदार माने यांनी शिरोळ तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच कामात दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असे स्पष्ट करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असे सुनावले. यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांना तात्काळ पंचनामा नुकसान भरपाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने पत्रकारांशी बोलताना म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी 102 मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शासनाच्या निकषानुसार या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने स्वतः राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील राहू शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सरसकट सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे ऊस पिकालाही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करू सन 2019 व 2021 या साली आलेला महापूर आणि सध्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे येथील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे तसेच शेतमजुरांना काम नाही. त्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड नाही शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांना एनडीआर निकषांपेक्षा अधिक नुकसान भरपाई व शेतमजुरांना अनुदान मिळावे याकरिता राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्यातील कुटुंबांना राज्य शासनाने जाहीर केलेला दिवाळीचा शिधा तात्काळ उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसात शिधा सर्वांना मिळेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, चंद्रकांत मोरे, राकेश खोद्रे, दादासो नाईक यांच्यासह तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे, शिरोळचे तलाठी राजू शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व शासकीय अधिकारी उपस्थित होते.









