कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेसंदर्भात ग्रा. पं.- देवस्थान पंचकमिटी-ग्रामस्थांची बैठक
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 2026 मध्ये भरविण्याचे ठरविण्यात आले आहे. यापूर्वी 1983 साली श्री लक्ष्मीदेवीची यात्रा भरविण्यात आली होती. आता जवळजवळ 42 वर्षांनी यात्रा भरविण्यात येणार असल्यामुळे ग्रामस्थांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 42 वर्षांनी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा भरविण्यात येणार असल्यामुळे गावातील सर्व वॉर्डातील नागरी समस्या यात्रेपूर्वी पूर्ण करणे गरजेचे असल्यामुळे देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पीडीओ यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन सोमवारी ग्राम पंचायतने देवस्थान पंचकमिटी सदस्यांना ग्रा.पं. कार्यालयात बोलावून बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा होत्या. बैठकीमध्ये श्री लक्ष्मीदेवी यात्रेपूर्वी गावचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी ग्रामीणच्या आमदार, खासदार, पालकमंत्री तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन गावासाठी मोठा फंड मिळवून घेऊन लवकरात लवकर गावचा सर्वांगीण विकास करून घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच ज्या धार्मिक विधी आहेत. त्या तुम्ही करून घ्या,असेही सदर मिटिंगमध्ये सांगण्यात आले. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा दिपा पम्मार, पीडीओ गोविंद रंग्यापगोळ, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, यल्लाप्पा पाटील, सुरेश राठोड, नवनाथ पुजारीसह इतर सदस्य, सदस्या तसेच देवस्थान पंचकमिटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी केले.









