जिल्ह्यातील 450 ग्रा.पं. व्याप्तीतील महिला, 204 महिला बचत गटांकडून शेवयाचे उत्पादन
बेळगाव : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावातील महिलांना तंत्रज्ञान आधारित मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांकडून लाखो रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेवया उत्पादन करणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील 450 ग्रामपंचायत व्याप्तीतील शेकडो महिला व 204 महिला बचत गटाकडून शेवयाचे उत्पादन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्यासाठी संघटित बाजारपेठ व सुविधांचा अभाव ही मोठी समस्या आहे. शेवया उद्योगाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, उपजीविका विभाग, संजीवनी केएसआरएलपीएस, डे ईन आरएलएम मोहिमेंतर्गत शेवयाला राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सुविधा,
पॅकींग व्यवस्था करणार आहे.
महिला बचत गटातील सदस्यांना हॉटेल उद्योगात सहभागी करून घेऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय उपजीविका अभियान (एनएलएम) अंतर्गत अक्का कॅफे सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जि. पं माध्यमातून ‘बेळगाव संजीवनी शेवया’चे ब्रँडींग करून राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेत विक्रीची योजना आखण्यात येत आहे.
बेळगाव शेवयाचे देशात नावलौकिक होणार
ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागात योग्य बाजारपेठ मिळाल्यास मदत होणार आहे. सरकारी अनुदान, सहकारी संस्थांकडून मिळणारा पाठिंबा व ऑनलाईन विक्री प्लॉटफार्मवरून प्रोत्साहन मिळाल्यास बेळगाव शेवयाचे देशात नावलौकिक होणार आहे. राज्यभरातील अक्का कॅफे, वाहतूक बसेस, रेल्वे व विमानतळ, सरकारी इमारतींमधील विक्री केंद्रे, खासगी कंपन्यांचे मॉल्स, ग्रामपंचायत, मनपा मालकीच्या विक्री केंद्रांमध्ये शेवयाला बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.









