डॉ. किरण ठाकुर यांचा महाराष्ट्र सरकारला खडा सवाल
बेळगाव :
सीमावासीय आज 70 वर्षे झाली काळादिन पाळून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरची लढाईही सुरू आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फेरीमध्ये सहभागी होतात. त्यांची ही तगमग महाराष्ट्र सरकारला दिसणार का? असा खडा सवाल महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते डॉ. किरण ठाकुर यांनी केला.
शनिवारी सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. ज्या राज्यात आम्हाला सामील व्हायचे आहे, ते राज्य केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. हा प्रश्न सीमावासियांचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. मराठी अस्मितेचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
सीमाप्रश्नाला वाचा फोडावी
आज 21 वर्षे झाली सीमावासियांचा सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढा सुरू आहे. महाराष्ट्र केवळ न्यायालयाकडे बोट दाखवून शांत बसत आहे. त्यामुळेच मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढत आहेत. एकदातरी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी दिल्लीत आंदोलन करून या प्रश्नाला वाचा फोडावी, असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले.









