मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती
पणजी : मासेमारी बंदी काळात राज्यात लोकांना फॉर्मेलिनमुक्त मासे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिले आहे. येत्या 1 जूनपासून 61 दिवसांसाठी मासेमारी बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्याचबरोबर मासेमारी बंदीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मासेमारी बंदीच्या काळात आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांमधून गोव्यात मासे आयात करण्यात येतात. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात फॉर्मेलिनचा वापर करण्यात येत असल्याचे गेल्या काही वर्षात उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठा गजहब माजला होता. तेव्हापासून अन्न व औषध प्रशासन खात्याकडून या फॉर्मेलिनच्या वापरावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. मत्स्योद्योग खात्याचे अधिकारीही विविध मार्केटमध्ये फिरून नमुने गोळा करत आहेत. ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार असून काही आक्षेपार्ह सापडल्यास लगेच एफडीएला कळविण्यात येणार आहे. या काळात राज्यात लोक मानस आदी पारंपरिक पद्धतीने पकडलेले मासे खातात. परंतु हल्लीच्या काही वर्षात अन्य राज्यातून मासे आयात करण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच त्यात फॉर्मेलिन नामक विषारी रसायनाचा वापर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. फॉर्मेलिनचा वापर मृतदेहांच्या जतनासाठी करण्यात येतो. ते पोटात गेल्यास कर्करोगासारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत फॉर्मेलिनयुक्त मासळी येणार नाही याची काळजी खाते घेईल, अशी माहिती हळर्णकर यांनी दिली.









