भारतात उत्पादन घेणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अल्फाबेटची उपकंपनी दिग्गज टेक कंपनी गुगल आता भारतात पिक्सेल स्मार्टफोनचे उत्पादन सुरु करणार असल्याचे संकेत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गुगलने काही कंपन्यांसोबत याकरीता चर्चा सुरु केली आहे. यामध्ये लावा इंटरनॅशनल लिमिटेड आणि डिक्सन टेक्नॉलॉजी लिमिटेड या भारतातील देशांतर्गत कंपन्यांचा समावेश होणार असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त गुगल फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूहाच्या भारतीय युनिट, इंडिया एफआयएच सोबत देखील चर्चा करत असल्याची माहिती आहे. सदरच्या कंपन्यांमधील चर्चेचे रुपांतर जर व्यवहारांमध्ये झाले तर गुगलला भारतामधील स्थानिक असेंब्लीद्वारे पिक्सेल स्मार्टफोनची विक्री वाढविण्यास मदत होणार आहे. यासह गुगल स्पीकरसारख्या अन्य हार्डवेअरचे उत्पादनही भारतात शिफ्ट करु शकते. मात्र याक्षणी गुगल, लावा, डिक्सन आणि फॉक्सकॉनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जागतिक कंपन्या चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. यूएस-चीन व्यापार युद्ध आणि कोविड लॉकडाउनमुळे उत्पादन पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीनला पर्याय शोधत असलेल्या जागतिक कंपन्यांच्या अनुषंगाने गुगलचे पाऊल आहे. त्याच वेळी, भारत हा उत्पादनांसाठी एक आकर्षक देश म्हणून उदयास आला आहे. चीनऐवजी भारतात उत्पादन सुरु करण्याचा विचार विदेशी कंपन्या करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील भारताला उत्पादन केंद्र म्हणून जगभर चालना देत आहेत.
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव व सुंदर पिचाई यांची भेट
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या महिन्यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची कॅलिफोर्नियातील माउंटनह्यू येथील कंपनीच्या मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी भारतातील स्थानिक उत्पादन मोहिमेबाबत चर्चा केली. त्याचवेळी या महिन्यात गुगलच्या काही अधिकाऱ्यांनी भागीदारीसंदर्भात भारताला भेट दिली. यामध्ये ग्राहक हार्डवेअर युनिटच्या ऑपरेटिंग प्रमुख अना कोरेलेस आणि जागतिक टिकाऊ उत्पादन ऑपरेशन्सच्या वरिष्ठ संचालक मॅगी वेई यांचा समावेश आहे.









