भालचंद्र जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची उपस्थिती
बेळगाव : डीसीसी बँकेवर आपल्या गटाचे वर्चस्व आहे. आम्ही प्रामाणिकपणे बँकेचे प्रशासन चालविणार असून बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणार आहे. लिंगायत समाजाच्या प्रतिनिधीची अध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर 10 दिवसांत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. बिनविरोध निवड झालेल्या अनेकांनी आपल्या गटाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीनंतर संकम हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, यापूर्वीच 9 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र बिनविरोध झालेल्यांबाबत चुकीची माहिती परविण्यात येत असून त्यांनी आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आम्ही लिंगायत समाजाच्या प्रतिनिधीला अध्यक्षपद देणार आहोत. याबाबत आम्ही अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सांगितले असून यावर आम्ही ठाम आहोत, असे त्यांनी सांगितले.
कोणीही आम्ही शांत असल्याचा गैरफायदा घेऊ नये. विरोधकांकडे बोलण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आम्ही बोलत नाही याचा अर्थ असे नाही की आम्हाला बोलता येत नाही. आम्ही डीसीसीला एक आदर्श बँक बनविणार असून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. येत्या पाच वर्षात 10 हजार कोटी रुपयांचे डिपॉझिट व 3.5 हजार कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वांना गर्व वाटेल असे आम्ही एक उत्कृष्ट असे प्रशासन देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आपली 50 कोटी रुपयांची पैज आहे. जर लक्ष्मण सवदी यांनी त्यांच्या गटातील उमेदवाराला जर डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी बसविले तर आम्ही 50 कोटी देऊ. जर आम्ही आपल्या गटाचा अध्यक्ष केल्यास लक्ष्मण सवदी यांनी 50 कोटी रुपये द्यावेत. लक्ष्मण सवदी हे केवळ गोंधळ निर्माण करण्यासारखे वक्तव्य करत आहेत. आम्ही एक आदर्शवत बँकेची वाटचाल करणार असून सर्वांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेलो असून सर्वांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.
डीसीसी बँकेवर सर्वोत्कृष्ट प्रशासन चालविणार : सतीश जारकीहोळी
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, डीसीसी बँकेवर सर्वोत्कृष्ट प्रशासन चालविणार आहे. यासाठी आपले व राज्य सरकारचे पूर्णपणे सहकार्य राहणार आहे. मागील वर्षभरापासून ज्याप्रमाणे बँकेचे प्रशासन चालविण्यात आले आहे. त्याप्रमाणे पुढील पाच वर्षे चालविणार आहे. सर्वांनी एकजुटीने निवडणुकीसाठी परिश्रम केले आहेत. डीसीसी बँकेसाठी बिनविरोध झालेल्यांचा पाठिंबा असून विरोधक केवळ गोंधळ माजवून देण्यासारखी वक्तव्ये करत आहेत, असे त्यांनी सांगितले. जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला असून जनतेच्या व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत असून जनतेने आपल्याला आशीर्वाद दिल्याने त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. लक्ष्मण सवदी यांनी एकत्र येऊन चर्चा करू, असे मतदानकाळात सांगितले होते. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. डीसीसी बँकेला एक आदर्श बँक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बिनविरोध झालेले प्रतिनिधी व विजयी उमेदवारांसह इतर उपस्थित होते.









