पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर 82 टक्के पंचनामे झाले आहेत. मात्र, दररोज पाऊस पडत असल्याने आकडेवारीही वाढत आहे. पावसामुळे पंचनाम्यात खंड पडत असला, तरी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
पुणे दौऱ्यावर आले असता कृषी आयुक्तांबरोबर सत्तार यांनी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, पूर्वी अवकाळी पाऊस हा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तालुक्यात पडायचा आणि तेव्हा त्या ठिकाणी पाहणी करून मदत केली जात होती. पण आता सातत्याने राज्यात वेगवेगळय़ा ठिकाणीही अवकाळी पाऊस होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आत्तापर्यंत झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर 82 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण दररोज पाऊस पडत असल्याने आकडेवारीही वाढत आहे. तसेच काही नवीन ठिकाणीदेखील पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसही हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असून, जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत पंचनामे करावेच लागतील. त्यात आता खंड पडला, तरी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयाबद्दल धाकधूक नाही
आमदारांच्या आपत्रतेच्या न्यायालयाच्या निकालाबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, धाकधूक आम्हाला नाही, धाकधूक त्यांना आहे. जसा निकाल लागेल, तसे ते सगळे चालते होतील. चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करत आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल, तो आम्ही सन्मानाने स्वीकारू, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सामना वाचत नसल्याचे नमूद करत संजय राऊत यांचाही त्यांनी समाचार घेतला.








