मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन : ताळगावात ओबीसी अधिवेशनाचे उद्घाटन
तिसवाडी : गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी संलग्न असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महासंघाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये काल गुरुवारी आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात त्यांनी हे आश्वासन दिले. आपण नेहमीच ओबीसी महासंघाशी जोडलेलो आहे. त्यांच्या संघर्षाचा साक्षीदार आहे. महासंघाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या जातील, यासाठी निधीची कमतरता येऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी पुढे सांगितले. गोव्यासंबंधीच्या मागण्यांबाबत माझे मित्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाला अनेक लाभ
फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. आम्ही ओबीसी युवकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. यासाठी वसतिगृहांमध्ये 60 हजार ऊपयांचे भत्ते देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ओबीसी समाजातून येतात, ही बाब समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. ओबीसी समाजाला पूर्वी मिळत नसलेले अनेक लाभ मोदी सरकारने उपलब्ध करून दिले आहेत.
ओबीसींसाठी काम करत राहणार
फडणवीस यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेचाही उल्लेख केला. माझ्यावर अनेकांनी टीका केली, पण मी ओबीसी समाजासाठी काम करणे थांबवणार नाही. त्यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन, असे आश्वासन त्यांनी दिले. या परिषदेत ओबीसी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा झाली, आणि समाजाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, गोवा अध्यक्ष मधू नाईक, व इतर पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित होते.









