मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : नोकऱ्या फसवणूक प्रकरणात खालच्या पातळीचे राजकारण
वास्को : सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणात विरोधकांकडून खालच्या पातळीवरील राजकारण केले जात आहे. विरोधकांच्या या राजकारणाला योग्य उत्तर देण्यात येईल. आपल्याला व आपल्या पत्नीला ज्यांनी या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री सावंत बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास दिल्लीहून गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर उतरताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गोव्यात भाजपाचे सरकार चांगले काम करीत आहे. सरकारचे कार्य विरोधकांना खुपत आहे. त्यामुळे कुठल्याही विषयाचे भांडवल ते सरकारविरुद्ध करीत आहेत. सरकारी नोकरी फसवणूक प्रकरण आपल्यामुळेच उघडकीस आलेले आहे. आपणच यात लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून पुढाकार घेतला होता.
त्यामुळेच अनेकांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिस तक्रारी केल्या. परंतु सध्या विरोधकांकडून आपल्यासह आपल्या पत्नी विरोधातही नाहक आरोप केले जात आहेत. आपली पत्नी राजकारणात आहे. मात्र, ती सरकारमध्ये नाही. विरोधकांकडून होणारे खालच्या पातळीवरील राजकारण योग्य नाही मागच्या पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत आपल्याला प्रथमच असा अनुभव आलेला आहे, आमच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यावे लागेल. त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला गुदरला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, नोकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास योग्यपद्धतीने होत आहे. मात्र, विरोधक सैरभैर झालेले आहेत. जामीनावर सुटलेलेही आरोप करीत आहेत. त्यांनी स्वत:लाच तपासायला हवे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.









