चिपळूण :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रशांत यादव आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य विकास मंत्री नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत यापुढे यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वतोपरी ताकद देऊ, अशी ग्वाही दिली.
मंगळवारी मुंबईला निघण्यापूर्वी प्रशांत यादव यांनी महामार्गावरील वालोपे येथे ग्रामदेवता श्री झोलाई देवीचे दर्शन घेऊन प्रवासाला सुऊवात करताना नव्या राजकीय वाटचालीसाठी देवीला साकडे घातले. यावेळी सोबत स्वप्ना यादव यांच्यासह चिपळूण नागरीच्या संचालिका स्मिता चव्हाण उपस्थित होत्या. त्यानंतर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह यादव हे चिपळूणहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
दुपारी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मंत्री राणे यांच्या उपस्थितीत प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांच्यासह जनार्दन पवार, दत्ताराम लिंगायत, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक नीलेश भुरण, योगेश शिर्के, दीपक महाडिक, जि. प. माजी सदस्य विजय देसाई, दीप्ती महाडिक, अनिल चिले, शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, रमण डांगे, स्मिता चव्हाण, सुगंधा माळी, सरस्वती हरेकर, अनंत हरेकर, सुभाष नलावडे, विजय कोळेकर, अनिल यादव, अभिनव भुरण, समीर बेचावडे, सुनील वाजे, रवींद्र सागवेकर, रमेश गोलामडे, रवींद्र पवार, चंद्रकांत बैकर, विभावरी जाधव, शशिकांत दळवी, अॅड. नितीन सावंत, अॅड. नयना पवार, अॅड. वैभव हळदे, डॉ. अमरसिंह पाटणकर, अभिजित सावंत यांच्यासह जिल्हा परिषदेचे 3 माजी सदस्य, पंचायत समितीचे 6 माजी सदस्य, सभापती, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, डॉक्टर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील एकूण 1,600 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यादव म्हणाले, चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुंबईत येऊन माझ्या पाठीशी उभे राहून मला बळ दिले. माझ्या घरातही पाणी शिरले आहे, तरीही आपण सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहात, हा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे सांगितले.
- कोकणात भाजपची ताकद वाढतेय : नीतेश राणे
मंत्री नीतेश राणे म्हणाले, प्रशांत यादव हे तळागाळाशी जोडलेले नेतृत्व आहे. त्यांनी 2024 च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवली. आता त्यांनी भाजपकडे वळून कोकणात आमची ताकद आणखी वाढवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातून भाजप गावागावात पोहोचेल याचा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना लागेल ती मदत आणि सर्वतोपरी ताकद देऊ.
- विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : रवींद्र चव्हाण
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलताना यादव हे आमचे मित्र असून त्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गावागावात पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रित करायचे आहे. यादव यांचा विश्वास तुटणार नाही याची ग्वाही आम्ही देतो, असे स्पष्ट केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह जिल्ह्यातून भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.








