स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात काही प्रमाणात असलेली बेरोजगारी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस कृतीवर भर दिलेला आहे. कौशल्य शिक्षणावर सरकारने भर दिला असून, याद्वारे बेरोजगारी कमी होणार आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ‘स्वयंपूर्ण गोवा 2.0’ या उपक्रमाद्वारे कौशल्य विकासावर भर दिला जात असून, कौशल्य विकासासाठी 200 कोटींची तरतूद सरकारने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.
समाजात फूट पाडणे नको
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात समाजविघातक गोष्टी कुणी करण्याचा विचार करीत असेल तर सरकार असल्या वृत्ती कधीच खपवून घेणार नाही. जाती-धर्माच्या नावाखाली नागरिकांमध्ये फूट पाड़ण्याचे प्रयत्न झाल्यास कडक कारवाई केली जाईल. राज्यातील जनतेनेही समाजात फूट पाडणाऱ्यांपासून सावध रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
राज्यातील म]िहला स्वावलंबी व्हावी, यासाठी सरकारच्या अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना रोजगारप्राप्ती होणार आहे. सरकारतर्फे चालविण्यात येणारी सर्व सरकारी उपहारगृहे (कॅन्टीन्स) अन्नपूर्णा योजनेखाली महिलांच्या स्वयंसहाय्य गटांना चालविण्यास दिली जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक विकास महामंडळामार्फत अगदी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले आहे, याचाही फायदा महिलांनी घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘माझी बस’ द्वारे प्रगती साधावी
‘माझी बस’ योजनेद्वारे राज्यात नवी क्रांति घडत आहे. या योजनेमुळे प्रवासी वाहतूक क्षेत्रात नवीन क्रांति घडणार आहे. राज्यातील खासगी प्रवासी बसमालकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
अॅप्रेंटिसशिपमध्ये 15 हजार रोजगार
युवकांना रोजगार मिळवून देण्यात सरकार कुठेच कमी पडलेले नसून, शिक्षित युवकांना नोकरीची वाट पहावी लागू नये यासाठी मुख्यमंत्री अॅप्रेंटिसशीप योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा युवकांना लाभ होत असून, आतापर्यंत 10 हजार युवकांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. या योजनेखाली सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमध्ये सुमारे 15 हजार जागा तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विविध मान्यवरांना सन्मान, सत्कार
या समारंभात मुख्यमंत्री सावंत यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला. त्यात पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व हवालदार सुधीर तळेकर यांना राष्ट्पती पदकाने सन्मानित करण्यात आले. अग्निशामक दलातील उपअधिकारी प्रशांत धारगळकर यांनाही राष्ट्रपदी पदक देण्यात आले. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक पुरस्कार होमगार्ड कॅरोलिना फर्नांडिस व नारायण पागी यांना देण्यात आला. राज्य सरकारचा गोपाळरत्न पुरस्कार अनंत मळीक यांना देण्यात आला. स्वयंपूर्ण मित्र दीक्षा तारी, प्रदीप सावंत, दत्तप्रसाद पाळजी, हरिश्चंद्र गावडे, सुदेश गावडे यांचाही सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक गोपाळ काकुलो यांचा मुख्यमंत्री सावंत यांनी खास पुरस्कार देऊन सन्मान केला.
कौशल्य विकासासाठी 200 कोटींची तरतूद
‘स्वयंपूर्ण गोवा 2.0’ या उपक्रमाच्या माध्यमाने राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास साधला जात आहे. टाटा संस्थेशी सरकारने सामंजस्य करार केलेला आहे. सर्व औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टाटा संस्थेद्वारे अंदाजित 156 कोटी रूपये तर राज्य सरकारतर्फे 40 कोटी खर्च केले जाणार आहेत. कौशल्य विकास होणे गरजेचे असल्याने सुमारे 200 कोटींची तरतूद केली असून, विविध 47 कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.









