सातारा :
सातारा जिह्यामध्ये अवकाळीच्या पावसामुळे घर, जमिनी, पिके, जनावरांची हानी झाली आहे. प्राथमिकदृष्ट्या 8 ते 10 कोटींचे नुकसान झाले आहे. तरीही सध्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार आहे. या नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शंभुराज देसाई म्हणाले, जिह्यात 21 ते 27 मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस झाला. 50 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे 38 घरांची पूर्णत: पडझड झाली तर 1 हजार 826 घरांची अंशत: पडझड आहे. जनावरांच्या 16 गोठ्यांनाही बाधा पोहोचली. त्याचबरोबर 1 हजार 868 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा हजारांवर आहे. या पावसात मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिकदृष्ट्या 8 ते 10 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मान्सूनपूर्व पावसांमध्ये गावांना जोडणारे रस्ते वाहून गेले आहेत. जिल्हा परिषद अखत्यारित रस्त्याच्या संबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुरुस्तीबाबत सूचना केली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही निधीसाठी बोलणे करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, पावसाळ्यामध्ये घाटातील दरडी कोसळत असतात. परिणामी रस्ते बंद होत असतात. त्यामुळे अभियंत्यांनी 24 तास सतर्क असायला हवे. आताच्या पावसातील नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होईल. यामध्ये झालेले नुकसान मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सातारा जिह्यामध्ये अवकाळीचा पाऊस गेला आठवडाभर कुठे मुसळधार तर कुठं संततधार सुरु होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. माण तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तर खटाव तालुक्यात विजेचा शॉक लागून हे मृत्यू झाला आहे, असे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिह्यात दोन जण कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ही लाट सौम्य आहे. पण, तरीही सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जिह्यातील शासकीय रुग्णालये, अधिक्रायांना सूचना केलेल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्यात यावेत, यासाठी औषध साठाही पुरेसा करुन ठेवला ठेवण्यात आला आहे.








