सावंतवाडी : प्रतिनिधी
गतवर्षी खलनायक ठरवलेल्या अजित पवार यांच्या स्वागतासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कसे धावत होते हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. केसरकर यांची या निमित्ताने लाचारी दिसत आहे .राज्यात सध्याच्या घडामोडी पाहता केसरकर यांचे मंत्रिपद राहते की नाही अशी शंका आता निर्माण झाली आहे, असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केसरकर यांना लगावला आहे डॉक्टर परोळेकर यांनी म्हटले आहे की गतवर्षी ठाकरे सरकार मधून बंड करून बाहेर पडल्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी अजित पवार यांच्यावर टीका करीत होते .यात केसरकर यांचाही समावेश होता .निधी देत नाहीत म्हणून अजित पवार यांना या सर्व मंडळींनी खलनायक ठरवले होते. तेच अजित पवार शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी केसरकर त्यांच्यामागे धावत असल्याचे चित्र राज्याने पाहिले आहे .यातून केसरकर यांची लाचारी दिसून येते. केसरकर यांचे मंत्रीपद टिकते की नाही असे शंका आता निर्माण झाली आहे. सध्या राज्यात सर्कस चालू आहे .मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणि खाते वाटपासाठी रात्रीच्या बैठका होत आहेत. मंत्रिमंडळात कोणाला ठेवावे की न ठेवावे यासंदर्भात खलबते चालू आहेत .शिंदे गटातील नऊ जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन नव्या मंत्र्यांना शपथ द्यावी अशी मागणी आता शिंदे गटात होत आहे. मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी धक्काबुक्की झाल्याच्याही घटना समोर येत आहेत. यातूनच केसरकर यांचे मंत्रीपद टिकते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. हीच बाब पालकमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याबाबतही आहे. ते अन्य जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत .नव्याने मंत्री झाल्यामुळे त्यांचे पालकमंत्री पद धोक्यात आले आहे .सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता जनतेचे प्रश्न बाजूला राहिले आहेत. त्यांचे देणे घेणे या राजकारण्यांना नाही असा टोलाही परुळेकर यांनी हाणला आहे.









