माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची माहिती
पणजी / विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक आपण बाणावलीमधूनच लढविणार आहे, अशी माहिती माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिली. या प्रतिनिधीशी बोलताना चर्चिल म्हणाले की आपण पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनतेच्या बळावर आपण विजयी होणार आहे. आपण कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार आहात असे विचारता मला पक्ष लागत नाही, मी जनतेचा उमेदवार आहे, असे ते म्हणाले. आपल्या विरोधात बाणावलीमध्ये कोणीही निवडणूक लढविली तरी देखील आपणच विजयी होईल, असे ते म्हणाले. आपण आपले कार्य चालूच ठेवलेले असून जनतेला मदत करण्याचे आपले काम चालू आहे. त्याच आधारावर जनतेने आपल्याला निवडणूक लढविण्यास सांगितलेले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. सहा आमदार कमी पडतील, असे भाकित त्यांनी केले. परंतु जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत गोव्यात भाजपचेच सरकार सत्तेवर राहील. आगामी निवडणुकीनंतर देखील इतर राजकीय पक्ष त्यांच्या मदतीला येतील आणि गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असेच चर्चिल यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अतिशय चांगले मुख्यमंत्री आहेत आणि ते जनतेचे मुख्यमंत्री आहेत, अडल्या नडलेल्यांना ते मदत करतात, असेही आलेमाव म्हणाले.









