गेल्या 25 वर्षात खोट्या भुलथापामुळे तरुणांना आलेली मरगळ झटकण्यासाठी, शेतकऱ्याला उभे करण्याकरीता आणि सामाजिक आणि वैचारिक रचना बदलण्यासाठी ही निवडणूक मी लढवणार आणि जिंकणार सुद्धा आहे, असा ठाम विश्वास समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे शेतकरी मेळावा, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेव म्हातुगडे होते.
घाटगे म्हणाले, माणसांमध्ये गुंतवणूक करा, मतामध्ये नाही. निवडणुका येतील, जातील. यश-अपयश मिळेल परंतु तुम्ही निर्मळ मनाने जोडलेली माणसं ही तुमची आयुष्यभर साथसोबत करतील असा विचार माझे वडील विक्रमसिंह घाटगे यांनी मला दिला आहे. शेतीच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. शेतकरी मातीतून सोने निर्माण करतो. कष्ट करतो, रक्ताचे पाणी करून तो जगतो. त्याला मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सुशिक्षित तरुणांना केवळ भुलभुलैय्या दाखवून दिशाहीन न करता योग्य दिशा दाखवण्याचे काम केले पाहिजे. यासाठी जनतेने मला साथ द्यावी. शासकीय योजनांच्या लाभासाठी लोकांना लाचारी पत्करू देणार नाही.
याप्रसंगी प्रताप पाटील, आकाश पाटोळे यांची भाषणे झाली. यावेळी शाहू कारखाना संचालिका सौ. रेखाताई पाटील, रंगराव तोरस्कर, चंदर दंडवते, माजी सरपंच छाया हिरूगडे ,उत्तम पाटील, आण्णा डाफळे, शिवाजी चिंदगे, नेताजी गुजर, धोंडीराम पाटील, भरत निकम, अशोक निकम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रवीण म्हातुगडे तर आभार विनायक हिरूगडे यांनी मानले.
कागल तालुक्याच्या भविष्यासाठी संधी द्या
कुणालाही पराभूत करण्यासाठी मी निवडणूक लढवणार नाही तर कागल तालुक्याच्या भविष्यासाठी आणि सर्वांगिण विकासासाठी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन श्री घाटगे यांनी यावेळी केले.








