दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत 4 निर्णयांवर सहमती : पायलट अन् गेहलोत यांच्यातील वाद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजस्थान काँग्रेसमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या गटबाजीला आता विराम मिळू शकतो. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात गुरुवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत चार महत्त्वाच्या निर्णयांकरता सहमती झाली आहे. राजस्थानात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर केला जाणार नसल्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. हा निर्णय एकप्रकारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. तर सचिन पायलट यांचा गेहलोत यांना होणारा विरोध पाहून पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उमेदवारांची यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित केली जाणार असल्याचे काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील समेटासंबंधी वेणुगोपाल यांनी कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
पक्ष एकजूट राहिल्यास राजस्थानात काँग्रेस पक्षाचा विजय होऊ शकतो असे या बैठकीत म्हटले गेले आहे. तसेच बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी एकजूट होत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारांची निवड जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारावर करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत सर्व मुद्द्यांवर सार्थक, व्यापक आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आमची पक्षसंघटना, नेते, आमदार आणि सर्व मंत्री मिळून काम करतील. राजस्थानात पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर यावा हेच आमचे लक्ष्य असल्याचे सचिन पायलट यांनी बैठकीनंतर बोलताना म्हटले आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद डाटासरा समवेत 29 नेते सहभागी झाले होते.
बैठकीतील 4 निर्णय
- राजस्थानात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर होणार नाही
- राजस्थानात पेपरलीक कायदा आणला जाणार (पायलट यांची मागणी)
- निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात
- पक्षातील वाक्युद्ध थांबणार, पक्षाची प्रचारमोहीम सुरू होणार









