मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : वाहतूक पोलीस विभागाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पर्वरी
पर्वरी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पर्वरी पोलीस स्थानकात वाहतूक विभाग सुरू केला आहे. लवकरच येथील जुन्या पोलीस वसाहतीत सुसज्य वाहतूक पोलीस स्थानक सुरु करण्यात येणार आहे. पर्वरीत उड्डाणपूल बांधणीचे कामही लवकरच सुरू केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
येथील पोलीस स्थानकात काल मंगळवारी वाहतूक विभागाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, साळगावचे आमदार केदार नाईक, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, वाहतूक अधीक्षक बोसुएट सिल्वा, अधीक्षक बॉस्को जॉर्ज, सरपंच स्वप्नील चोडणकर व अन्य उपस्थित होते.
पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार
पर्वरीच्या आणि एकूणच राज्याच्या विकासासाठी लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मोप विमानतळ, जुवारीवरील आठ पदरी पूल, अटल सेतु हे प्रकल्प पुढच्या 25 वर्षांचा विचार करून सुरू केले आहेत. साधनसुविधा जसजशा वाढत आहेत तसे मनुष्यबळ कमी पडते. त्यासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांना कामवर रुजू केले जाईल.
पर्यटन प्रतिमा जपण्याची गरज
जगाच्या नकाशावरील पर्यटनक्षेत्रात गोव्याची प्रतिमा खूप चांगली आहे. त्यासाठी पर्यंटकाशी व्यवहार करताना पर्यटक टॅक्सी चालक, हॉटेल्स, लोक यांनी असभ्य कृत्य करून गालबोट लावू नये. तसेच ‘सोनेरी गोवा ,विकासनशील गोवा’ म्हणून अग्रेसर होण्यासाठी लोकांनी सरकारला सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
आमची मागणी पूर्ण : खंवटे
उत्तर गोव्यात प्रवेश करण्यासाठी पर्वरीतून जाणारा हा महामार्ग जवळच असल्याने येथे दररोज मोठय़ा प्रमाणात रहदारी होत असते. तसेच नवीन वर्ष, सलग जोडून आलेल्या सुट्टय़ा, सण, उत्सव या कालावधीत वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. त्याचा त्रास स्थानिक लोकांना होत आहे. छोटे मोठे अपघातही होत असतात. त्यासाठी ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी येथे वाहतूक विभाग सुरू करावा ही आमची मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. उड्डाण पूल आणि प्रत्यक्ष मोप विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होणार याचा विचार करून लवकरच सुसज्य असे वाहतूक पोलीस स्थानक सुरू करावे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्वरीत काल मंगळवारपासून ठिकठिकाणी वाहतूक पोलीस उभे करण्यात आले असून ते वाहतुकीत सुसूत्रता आणत होते. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी स्वागत केले. केशव नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर बोसुएट सिल्वा आभार मानले.









