राष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी 10 ते 5 वा. पर्यंत मतदान : चैन्नईला गेलेले काँग्रेसचे पाच आमदार गोव्यात परत
प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपतीपदासाठी आज सोमवारी दि. 18 रोजी गोव्यातील आमदार पर्वरी येथील विधानसभा संकुलात मतदान करणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मागील रविवारी काँग्रेसचे काही आमदार फुटणार आणि भाजपमध्ये जाणार म्हणून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोव्यातील काँग्रेस आमदारांची मते फुटण्याचा धोका कायम असून निकालानंतर ते स्पष्ट होणार आहे. आमदारांसह लोकसभा, राज्यसभा खासदाराही या मतदानात भाग घेणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणूक मतपत्रिका व इतर साहित्य गोव्यात या आधीच पोहोचले असून आमदारांना राष्ट्रपतीपदाच्या मतदानाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. गोव्यातील प्रत्येक आमदाराचे मूल्य 20 मते असून 40 जणांची मिळून 800 मते आहेत. प्रत्येक खासदाराचे मूल्य 700 मते आहेत.
द्रौपदी मुर्मू यांना 1900 मते मिळणार
सत्ताधारी पक्षाचे एकूण 25 आमदार असून त्यात भाजप 20, मगोप 2, अपक्ष 3 समाविष्ट आहेत. सर्व 25 आमदारांची एकुण मते 500 होतात. गोव्यात उत्तर गोवा व राज्यसभा खासदार असे दोन भाजपाचे खासदार असल्याने त्यांची मते 1400 होतात. त्यामुळे गोव्यातून एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 1900 मते मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. गोव्याचे खासदार दिल्लीत मतदान करणार आहेत.
यशवंत सिन्हांना एक हजार मतांची शक्यता
गोव्यात 15 विरोधी आमदार असून त्यात 11 काँग्रेस, 2 आप, 1 गोवा फॉरवर्ड व 1 आरजीच्या आमदाराचा समावेश आहे. त्यांची एकूण मते 300 होतात तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे खासदार असल्याने त्यांची 700 मते धरून त्यांची एकूण मते 1000 होतात. ती युपीए उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
विरोधीपक्षीय आमदारांची मते सिन्हा यांनाच : पाटकर
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, आप, गोवा फॉरवर्ड व आरजीपी या तिन्ही विरोधी पक्षीय आमदारांशी बोलणी केली असून त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना मतदान करावे, अशी विनंती केली आहे. ते त्यांना पाठिबा देतील, अशी आशा आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्या विरोधात अपात्रता याचिका यापूर्वीच दाखल करण्यात आली असून पुढील कृतीची प्रतीक्षा आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा गुंता लवकरच सुटणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील विरोधी पक्षीय आमदारांची सर्व मते राष्ट्रपती निवडणुकीत सिन्हा यांनी मिळतील आणि ती फुटणार नाहीत, असा दावा पाटकर यांनी केला आहे. चेन्नई येथे गेलेले काँग्रेसचे आमदार काल रविवारी सायंकाळी गोव्यात परतले.
किती मूल्य आहे गोव्यातील आमदार, खासदारांचे
- गोव्यात एकूण आमदार 40
- एका आमदाराचे मूल्य 20
- गोव्यात एकूण खासदार 3
- एका खासदाराचे मूल्य 700









