सत्ताधारी आघाडीची टोप येथे प्रचार सभा
कोल्हापूर प्रतिनिधी
विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यातून राजाराम कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासह को-जनरेशन प्रकल्प उभारण्याचे सांगत आहेत. यापूर्वी हेच करण्याचा आम्ही प्रयत्न करताना हेच विरोधक आडवे पडले होते. कारखान्यावर कर्जाचा बोजा नको असे म्हणूत विस्तारीकरण आणि को जनरेशनला विरोध करणारेच आता प्रकल्प सुरु करण्याच्या गप्पा मारत आहेत. कारखान्यावर कर्जाचा बोजा नको म्हणणारे आता डी.वायमधून लुटलेल्या पैशाने राजाराममध्ये को-जेन उभारणार आहेत का? असा सवाल अमल महाडिक यांनी उपस्थित केला. हातकणंगले तालुक्यातील टोप येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा >>> नरके गट पैरा फेडणार! सतेज पाटील यांना नरके गट गटाचा पाठींबा
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, कोणत्याही चांगल्या निर्णयाला विरोध करायचा आणि नंतर का केले नाही म्हणून कांगावा करायचा हीच विरोधकांची खेळी आहे. आजवर स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करुन आम्ही राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवला आहे. पण विरोधकांना काहीही करुन हा कारखाना घशात घालायचा आहे. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या सतेज पाटलांची आम्ही त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र दातखीळ बसते असा आरोप माजी आमदार महाडिक यांनी केला.
यावेळी कल्लेश्वर मुळीक, श्रीपती पाटील, लक्ष्मण पाटील, दामोदर पाटील, विष्णुपंत पाटील, संभाजी महाडिक, पिलाजी पाटील, शिवाजी पाटील, बापू पोवार, माणिक पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.