जीएसटी मंडळाच्या बैठकीत करवाढ होणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वस्तू-सेवा कराशी संबंधित मंत्रीगटाने सिगरेट, बाटलीबंद पेये, तंबाखू इत्यादी वस्तूंवरील वस्तू-सेवा करात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या पदार्थांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. या संबंधातील अंतिम निर्णय 21 डिसेंबरला होणाऱ्या वस्तू-सेवा (जीएसटी) करमंडळाच्या बैठकीत होणार आहे.
त्याचप्रमाणे अधिक दराच्या तयार कपड्यांवरील करही वाढविला जाण्याची शक्यता आहे. 1 हजार 500 रुपये किमतीपर्यंतच्या तयार कपड्यांवर 5 टक्के, 1 हजार 500 रुपये ते 10 हजार रुपये किमतीपर्यंतच्या तयार कपड्यांवर 18 टक्के, तर 10 हजार रुपयांपेक्षा अधिक दराच्या तयार कपड्यांवर 28 टक्के वस्तू-सेवा कर लागू करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती आहे.
बैठकीत होणार अंतिम निर्णय
21 डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेत वस्तू-सेवा करमंडळाची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीसमोर हे करवाढीचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यांच्यावर बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. पण सर्वसाधारणपणे मंत्रीगटाने ठेवलेले प्रस्ताव वस्तू-सेवा करमंडळाच्या बैठकीत संमत केले जातात. त्यामुळे हे प्रस्तावही संमत होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तंबाखू उत्पादनांवर विशेष कर
तंबाखू आणि तंबाखू उत्पादनांवर वस्तू-सेवा कराचे प्रमाण 35 टक्के असेल, असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. मात्र, ही विशेष व्यवस्था असेल. इतर सर्व वस्तू आणि सेवांसाठी सध्याची चौस्तरीय कररचना लागू राहील. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के ही सध्याची चौस्तरीय व्यवस्था आहे.
सोमवारच्या बैठकीत प्रस्ताव
गेल्या सोमवारी वस्तू-सेवा कराशी संबंधित विशेष मंत्रीगटाची बैठक बिहारचे उपमुख्यमंत्री समर्थ चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीत करवाढीच्या प्रस्तावांना अंतिम स्वरुप देण्यात आले. आता हे प्रस्ताव करमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात येतील आणि संमतीनंतर हे कर लागू करण्यात येणार आहेत. बैठकीत एकंदर 148 वस्तू आणि सेवांच्या करांचा आढावा घेण्यात आला.
कपातही होणार
काही वस्तूंवरील करात कपातही करण्यात येणार आहे. अभ्यासाच्या वह्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणण्यात येईल. तर 15 हजार रुपये दरापेक्षा जास्त दराच्या पादत्राणांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 28 टक्के करण्यात येईल. महागड्या मनगटी घडाळ्यांवरील करात ऑक्टोबरमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशीही माहिती अर्थविभागाकडून देण्यात आली.
उत्पन्न वाढण्याची शक्यता
मंत्रीगटाने मांडलेले करवाढीचे प्रस्ताव वस्तू-सेवा कर बैठकीत स्वीकारले गेल्यास करसंकलनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांना सुसह्या होईल, अशा प्रकारे करण्यात आली आहे. जीवनावश्यक अशा अनेक सेवा आणि वस्तूंवरील करांमध्ये वाढ होणार नाही. उलट अशा काही वस्तूंवरील करात कपातच होऊ शकते, असेही स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.
प्रक्रिया सुरुच राहणार
विविध वस्तू आणि सेवांवरील वस्तू-सेवा कराचा आढावा घेण्याची प्रक्रिया यापुढेही होत राहणार आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मंत्रीगटाला कालावधीवाढ देण्यात येणार आहे. मंत्रीगटाकडून विविध वस्तू आणि सेवांवरील करांचा विचार सातत्याने करण्यात येणार आहे. तसेच परिस्थितीनुसार सूचना आणि प्रस्तावही आणले जाणार आहेत. सर्वसामान्यांना त्रास न होता, सरकारचे करउत्पन्न कसे वाढविता येईल, यावर सातत्याने विचार केला जाईल. महागड्या वस्तूंवरील कर जास्त वाढविल्यास हा समतोल साधता येणे शक्य आहे. त्यामुळे त्या दिशेने सरकारची वाटचाल होत आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
समतोल निर्णय घेतले जाणार
ड सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा न पाडता उत्पन्न वाढविण्याची योजना
ड महाग वस्तू अधिक महाग झाल्यास त्यांच्या खपावर विशेष परिणाम नाही
ड कररचनेचा आढावा विशेष मंत्रीगटाकडून वारंवार घेतला जाण्याची योजना
ड येत्या 21 डिसेंबरला वस्तू-सेवा करमंडळाची दिल्लीत बैठक आयोजित









