विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती (पास्वान) या पक्षाचे नेते चिराग पास्वान यांनी बिहारच्या राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय राजकारणात अधिक राहण्यापेक्षा बिहारच्या राजकारणात आपल्याला अधिक स्वारस्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्वाचे मानण्यात येते.
मी केवळ बिहार आणि बिहारची जनता यांच्या हिताकरताच राजकारणात आलो आहे. ‘बिहार प्रथम’ हाच माझा दृष्टीकोन आहे. बिहार हे राज्य समृद्ध व्हावे आणि ते इतर विकसीत राज्यांच्या तोडीस तोड व्हावे, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी लवकरच त्या संदर्भातील निर्णय घेणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
खासदार म्हणून शक्य नाही
मी तीन वेळा बिहारमधून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आलो आहे. मी केंद्रात मंत्रीही आहे. तथापि, बिहारचे हित मी दिल्लीत राहून साधू शकणार नाही, अशी माझी भावना झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यात परतण्याची माझी इच्छा असून माझ्या पक्षालाही असेच वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
चिराग पास्वान हे दिवंगत नेते रामविलास पास्वान यांचे पुत्र आहेत. ते सध्या बिहारमधील हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतात. बिहारमध्ये येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्याच्या काही भागांमध्ये पास्वान यांच्या पक्षाचा प्रभाव आहे. बिहारचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा असावी, असा अर्थ त्यांच्या या विधानातून काढला जात आहे. बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती पक्ष आणि इतर दोन छोट्या पक्षांची युती असून ती सत्तेवर आहे. आगामी विधानसभा निवडणूकही युतीच्या माध्यमातूनच लढविण्याचा निर्धार युतीतील पक्षांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पास्वान यांनी राज्यात परतण्याचा विचार चालविला असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. अद्याप, त्यांच्या विधानावर भारतीय जनता पक्ष आणि युतीतील इतर पक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात परतण्याची पास्वान यांची इच्छा पूर्ण होणे शक्य आहे.
चुरशीची निवडणूक शक्य
बिहारमध्ये यावेळी राज्यात सत्ताधारी असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी महागठबंधन यांच्यात चुरशीचा संघर्ष होईल, अशी शक्यता आहे. महागठबंधामध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर काही पक्षांचा समावेश आहे. मागची विधानसभा निवडणूकही चुरशीची झाली होती. यावेळी सहा महिने आधीपासूनच निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. पावसाळ्यानंतर या निवडणुकीची अधिसूचना काढली जाणार आहे.








