काजू उत्पादक चिंतेत : काजू हंगामाला प्रारंभ
बेळगाव : गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या काजूबागा मोहोर येऊन बहरु लागल्या आहेत. तर काही ठिकाणी लागवडीलाही प्रारंभ होऊ लागला आहे. मात्र मागील काही वर्षांपासून काजू उत्पादकांना समाधानकारक भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा देखील काजू दराचा यक्षप्रश्न उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांकडून काजू बागायतीचे स्वच्छतेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे येत्या काळात हंगामाला जोर येणार आहे. त्यामुळे काजूला समाधानकारक दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत काजू बागांना मोहोर जोमाने येऊ लागला आहे. त्याबरोबर काही ठिकाणी लागवडही सुरू झाली आहे. येत्या 20 ते 25 दिवसांत हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे यंदा तरी अपेक्षित दर मिळणार का? या विवंचनेत उत्पादक शेतकरी सापडले आहेत. गतवर्षी 90 ते 95 रुपये प्रति किलो दर मिळाला होता. मात्र यंदा 125 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी अपेक्षा आहे.
विशेषत: जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात काजू क्षेत्र अधिक आहे. विशेषत: तालुक्यातील पश्चिम भागात उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. मात्र उत्पादीत काजू बियांना विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने चंदगड तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेल्या आठवडी बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागते. शिवाय मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागते. यासाठी काजू उत्पादकांसाठी बाजारपेठ उपलब्ध करावी, अशी मागणीही होत आहे. व्यापारी ठरवतील त्या दराला काजू विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसतो. अलीकडच्या काही वर्षांत काजू लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगल्या जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनातही साहजिकच वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत दर योग्य मिळत नसल्याने फटका बसू लागला आहे. मागील काही वर्षांत या काजूला योग्य भाव मिळत नसल्याने मिळेल त्या दराला विकण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर येऊ लागली आहे.









