‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : महापालिका आरोग्य-स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी धारेवर
बेळगाव : सफाई कामगारांना देण्यात येणारा अल्पोपहार प्लास्टिक पिशवी आणि प्लेट्समधून देण्यात येत असल्याने ‘तरुण भारत’ने शुक्रवार दि. 28 च्या अंकात ‘प्लास्टिक प्लेटमधून आहार; दिव्याखाली अंधार’ या मथळ्याखाली सचित्र सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताची दखल घेत शनिवारी महापालिकेत पार पडलेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांना धारेवर धरण्यात आले. त्यावेळी सफाई कामगारांना अल्पोपहार देण्यासाठी तातडीने स्टीलची भांडी खरेदी केली जातील, असे आश्वासन अभियंता कलादगी यांनी बैठकीत दिले.
शुक्रवार दि. 28 रोजी महापालिका आवारातील प्रशासकीय इमारतीच्या स्थायी समिती सभागृहात आरोग्य स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश कांबळे होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी मागच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. बैठकीत चर्चेवेळी सदस्य नितीन भातकांडे यांनी सफाई कामगारांना सकाळच्या वेळी देण्यात येणारा अल्पोपहार प्लास्टिकची पिशवी आणि प्लेटमधून दिला जात असल्याबाबत ‘तरुण भारत’मधून बातमी प्रसिद्ध झाल्याचे सांगितले.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये, अशी सूचना करत पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांना धारेवर धरले. त्यावर उत्तर देताना अभियंता कलादगी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी सफाई कामगार काम करतात, त्या ठिकाणी अल्पोपहार व अंडी दिली जात असल्याचे सांगितले. तसेच तातडीने स्टीलची भांडी खरेदी केली जातील, असेही स्पष्ट केले. सध्या इंदिरा कँटीनच्या ठेकेदाराकडेच अल्पोपहार पुरविण्याची जबाबदारी आहे. मात्र, कायमस्वरुपी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेकडून तुरमुरी कचरा डेपोत पिंक पोल्ट्री सुरू करण्यात आली असून त्यामधून उपलब्ध होणारी अंडी लवकरच सफाई कामगारांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. सध्या कोंबड्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण होत असल्याने कामगारांना अंड्यांऐवजी दूध किंवा ताक देण्याबाबत विचार व्हावा, असे शैलेश कांबळे यांनी सूचित केले. मात्र, बर्ड फ्लू आणि अंड्यांचा काही संबंध नसल्याचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न
बैठकीवेळी अध्यक्ष शैलेश कांबळे यांनी आरोग्य निरीक्षकांना काही समस्या असल्यास त्या बैठकीपुढे मांडाव्यात, अशी सूचना केली. त्यावेळी एका आरोग्य निरीक्षकाने सकाळच्या वेळी सफाई कामगारांना पुरविण्यात येणारा अल्पोपहार कमी प्रमाणात पाठविला जात असल्याने तो अपुरा पडत आहे, अशी तक्रार केली. हा प्रश्न उपस्थित होताच अभियंता हणमंत कलादगी यांनी संबंधित आरोग्य निरीक्षकाला या समस्येऐवजी दुसरी काही समस्या असल्यास मांडावी, असे म्हणत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित अध्यक्ष व सदस्यांनी अभियंत्याला गप्प करत आरोग्य निरीक्षकाला समस्या मांडण्यास सांगितले.









