आमदार प्रवीण आर्लेकर: सभापतींच्या श्रमधाम योजनेला आर्थिक मदत
पेडणे : काणकोण मतदारसंघाचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेले श्रमधाम योजनेचे कार्य महान आहे. आपणही अशाच प्रकारचे काम पेडणे मतदारसंघात करणार आहे. आपण गरजू लोकांना घरे बांधून देणार आहे, असे गोवा हस्तकला लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्रमधाम योजनेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सामाजिक कार्याला आर्थिक मदत म्हणून आपल्याकडून एक लाख ऊपयाचा धनादेश नुकताच सभापती रमेश तवडकर यांच्याकडे पर्वरी येथे सचिवालय कार्यालयात सुपूर्द केला. सभापतीच्या श्रमधाम योजनेचे कौतुक करत समाजाप्रती सभापती रमेश तवडकर यांचा आदर आणि प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. श्रमधाम योजनेसाठी आपली ही थोडीसी मदत असल्याचे प्रवीण आर्लेकर म्हणाले. यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी आमदार प्रवीण आर्लेकर त्यानी जे दायित्व दाखवले आणि आर्थिक मदत श्रमधाम योजनेसाठी दिली आणि मदत केली त्या मदतीबद्दल त्यांना धन्यवाद दिले.









