यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 13 मतदारसंघांमध्ये 1 जूनला मतदान होत आहे. 2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती झाली होती. तथापि, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच मोठा विजय राज्यात झाला होता. यावेळी अशी युती नाही. पण समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती आहे. गेल्या निवडणुकीत या 13 जागांपैकी 2 जागा बहुजन समाज पक्षाने जिंकल्या होत्या. यावेळी मात्र हा पक्ष एकटा असल्याचे आव्हान मोठे आहे.
2019 मध्ये बहुजन समाज पक्षाने या 13 जागांपैकी 5 जागी तर समाजवादी पक्षाने 8 जागी उमेदवार दिले होते. बहुजन समाज पक्षाने गाझीपूर आणि घोशी या जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्या होत्या. तसेच देवरिया, बान्सगाव आणि सलेमपूर या तीन जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यंदाच्या निवडणुकीत या पक्षाची कोणाशीही युती नसल्याने मतविभाजन होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत युतीचा लाभ बहुजन समाज पक्षाला अधिक झाला होता.
यंदा काय होणार…
यावेळी पूर्वांचल भागात बहुजन समाज पक्षासाठी लढत सोपी नाही. एकतर या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या बराच काळ निष्क्रिय होत्या. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी कार्य सुरु केले. त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी, बहुजन समाज पक्षाच्या प्रचाराला धार चढल्याचे पहावयास मिळाले नाही, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. साहजिकच, मायावती यांच्यासमोर गेल्यावेळच्या दोन जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. ते व्यवस्थित हाताळता आले तरी पुष्कळ अशी स्थिती आहे.
खरी स्पर्धा भाजप-सपमध्येच
पूर्वांचलमध्ये खरी स्पर्धा यंदा भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षातच असल्याचे मानले जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 13 पैकी 9 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. या पक्षाला 48 टक्के मतेही पडली होती. त्याखालोखाल बहुजन समाज पक्षाचा क्रमांक होता. काँग्रेसचे फारसे अस्तित्व या भागात दिसत नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाकडूनच विरोधकांच्या आघाडीला अपेक्षा आहे. समाजवादी पक्ष 13 पैकी 3 जागांवर आव्हान उभे करु शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने यावेळी या मतदारसंघांमध्ये जातीय समीकरण बळकट करण्यावरही भर दिल्याने नेमके काय होणार, हे 4 जूनलाच समजू शकणारआहे.









