अनेकजण जगण्यासाठी भीक मागतात, हे आपल्याला माहीत आहे. असे भिकारी रस्त्यांवर, सार्वजनिक स्थानी, रुगणालयांबाहेर, प्रार्थनास्थळांबाहेर किंवा शॉपिंग मॉलबाहेर उभे असतात, हे आपण कित्येकदा पाहतो. कोणी दयाळूपणे त्यांना भीक देतात, तर कोणी त्यांची हेटाळणी करतात. भीक मागणे हे तिरस्करणीय काम मानले जाते. तथापि, काहीजण एक व्यवसाय म्हणून भीक मागतात. त्याच्यामागे त्यांची पद्धतशीर योजना असते. अनेक ‘भिकारी’ अशा प्रकारे ‘श्रीमंत’ही झाल्याची वृत्ते आपल्या वाचनान काही वेळा येतात. मृत भिकाऱ्यांकडे लक्षावधी रुपयांची संपत्ती मिळाल्याची वृत्तेही प्रसिद्ध होत असतात.
पण अलिकडच्या काळात ‘ऑनलाईन’चा बोलबाला झाल्यापासून भीक मागण्याच्या पद्धती आणि कारणेही नवी बनली आहेत. अन्नासाठी किंवा जगण्यासाठी नव्हे, तर चैनीच्या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून भीक मागण्याचे प्रकार समोर येत आहेत. असेच एक उदाहरण ब्रिटनमध्ये सध्या घडत आहे. या देशातील जेम्मा केली नामक एक महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या महिलेला कार खरेदी करायची आहे. तथापि, तिच्याजवळ एवढे पैसे नाहीत. तरीही तिला कार हवी आहे. त्यामुळे तिने लोकांकडे ऑनलाईन भीक मागण्याची योजना केली आहे. ती लोकांकडे प्रत्येकी 100 रुपयांची मागणी ऑनलाईन करीत आहे.
तिने टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ सादर केला आहे. आपल्याला कारची आवश्यकता असून लोकांनी प्रत्येकी 1 पौंडाचे साहाय्य आपल्याला करावे, अशी तिची विनंती आहे. सध्या एका पौंडाची किंमत 118 रुपये आहे. अशा प्रकारे भारतीय चलनात सांगायचे, तर ही महिला प्रत्येकाकडे 118 रुपयांची मागणी करत आहे. तिचा हा उपाय काही प्रमाणात यशस्वी होतानाही दिसून येतो. तिने लोकांना ऑनलाईन आवाहन केल्यापासून 48 तासांच्या आत तिच्या नावावर 23 हजार रुपये, म्हणजे साधारणत: 400 पौंडाची रक्कम जमा झाली आहे. अर्थातच, तेव्हढी रक्कम कार घेण्यासाठी पुरेशी नाही. या खरेदीसाठी तिला किमान 5 हजार पौंड जमा करावे लागणार आहेत. पण अत्यंत कमी वेळात इतके पैसे तिच्या नावावर जमा झाल्याने तिच्या आशा पल्लवीत झाल्या असून आपले कार घेण्याचे स्वप्न अशा प्रकारे ऑनलाईन भीक मागून पुरे होईल, असा तिचा विश्वास आहे.









